
लग्न होऊन एकत्र सुखी संसाराची स्वप्न बघणाऱ्या एका नवविवाहित जोडप्याचा संसार अर्ध्यावरच मोडला. ट्रेलर ट्रकचालकाच्या एका चुकीमुळे उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात एका नवविवाहित जोडप्याचा दुर्दैवी अंत झाला. दोघेही मोटारसायकलवर प्रवास करत असताना वेगाने येणाऱ्या ट्रेलर ट्रकने धडक दिल्याने या जोडप्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन कुमार सिंह (29) आणि त्याची पत्नी रिंकी सिंह असे मृत जोडप्याचे नाव आहे. हलधरपुरच्या गढवा मोड परिसरात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा भयंकर अपघात घडला. रिंकी सिंह आपल्या नवऱ्यासोबत लधरपुरमध्ये आपल्या माहेरी कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेली होती. दोन तास कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्यानंतर मी पुन्हा लवकरच भेटायला येईन असं म्हणत हे जोडपे पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. मात्र ही भेट त्यांची शेवटची ठरली.
पवन कुमार आणि रिंकी हे दोघेही दुचाकीवरून प्रवास करत होते. हलधरपुरचा रस्ता रहदारीचा असल्यामुळे पवनकुमार ने हेल्मेट घातले नव्हते. या रस्त्यावर सतत मोठ्या अवजड वाहनांची ये जा असते. अशातच बिहारला जाणाऱ्या एका भरधाव ट्रेलर ट्रकने दुचाकीला धडक दिली. दरम्यान पवनकुमारच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. रिंकीलाही गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्य़ामुळे सध्या त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान अपघातावेळी प्रत्यक्षदर्शींनी वाढत्या अपघातांची कारणे दिली. चालकाचे गाडी चालवताना मोबाईल वापरणे हेच अपघाताचे महत्त्वाचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातातही चालकाचे मोबाईलमध्ये लक्ष असल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.