
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. विमानतळावरील शौचालयातील कचराकुंडीत नवजात बालकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. हा मृतदेह कुणी टाकला याचा शोध घेण्यासाठी पोलीस विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास टर्मिनल 2 मधील शौचालयात कचराकुंडीत नवजात बालकाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. सुरक्षा अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बालकाला ताब्यात घेत रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी बालकाला मृत घोषित केले.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे. सर्व प्रवाशांची माहितीही तपासली जात आहेत. याशिवाय पोलीस रुग्णालये, शेल्टर होम आणि अनाथाश्रमांशी संपर्क करत आहेत.