न्यूझीलंडच्या ‘बी’ टीमकडून पाकिस्तानचे वस्त्रहरण, यजमानांचे वन डे मालिकेत 3-0 ने निर्भेळ यश

यजमान न्यूझीलंडच्या ‘बी’ टीमने दौऱ्यावर आलेल्या पाहुण्या पाकिस्तानचे टी-20 मालिकेनंतर वन डे क्रिकेट मालिकेतही वस्त्रहरण केले. न्यूझीलंडने तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामन्यात पाकिस्तानचा 43 धावांनी धुव्वा उडवून मालिकेत 3-0 फरकाने निर्भेळ यश मिळविले. न्यूझीलंडचा मायकेल ब्रेसवेल या सामन्याचा मानकरी ठरला, तर बेन सियर्सने मालिकावीराचा बहुमान मिळविला.

न्यूझीलंडकडून मिळालेले 265 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 40 षटकांत केवळ 221 धावांवरच गारद झाला. त्यांच्याकडून बाबर आझमने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. अब्दुल्ला शफिक (33), कर्णधार मोहम्मद रिझवान (37) व तय्यर ताहिर (33) हे इतर धावांची तिशी ओलांडणारे फलंदाज ठरले. न्यूझीलंडकडून बेन सियर्सने 5 फलंदाज बाद केले. जेकोब डफीने 2, तर मायकेल ब्रेसवेल, महम्मद आब्बास व डॅर्ली मिचेल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 8 बाद 264 धावसंख्या उभारली. यात रिस मारियू (58) व कर्णधार मायकेल ब्रेसवेल (59) यांनी अर्धशतके झळकाविली. याचबरोबर डॅलीं मिचेल (43), हेन्री निकोलस (३१) व टीम सेफर्ट (26) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. पाकिस्तानकडून अकिफ जावेदने 4, तर नसीम शाहने 2 फलंदाज बाद केले. याचबरोबर फहिम अश्रफ व सुफियान मुकिन यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.