न्यूझीलंडची तिरंगी मालिकेत बाजी, अंतिम लढतीत पाकिस्तानचा पाच गडी राखून धुव्वा

चॅम्पियन्स ट्रॉफी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना न्यूझीलंडने पाकिस्तानला घरच्या मैदानावरच दणका दिला आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्या खेळवल्या गेलेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या दृष्टीने ‘शंखनाद’ केला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी घरच्या मैदानावर होत असल्याने पाकिस्तानला विजेतेपद कायम राखण्याची सुवर्णसंधी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सरावाच्या दृष्टीने पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तिरंगी मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. आफ्रिका या स्पर्धेत आधीच बाहेर फेकला गेल्याने आज (दि. 15) पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम लढत रंगली.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 49.3 षटकात अवघ्या 242 धावांत गुंढाळला गेला. विल्यम ओरुर्क याच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजीचा निभाव लागला आहे. विल्यमने पाकिस्तानचे चार फलंदाज
बाद करत त्यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्याशिवाय मायकेल ब्रेसवेल याने दोन, तर मिचेल सँटनर, जेकॉब आणि नॅथन स्मिथ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

243 धावांच्या आव्हानाचा पाठलाग न्यूझीलंडने अगदी सहज केला. डेवॉन कॉन्वे आणि केन विलियम्सन या जोडीनं 71 धावांची भागीदारी रचत संघाला विजया समिप नेले. केन 34 धावा करून, तर कॉन्वे 48 धावांवर बाद झाला. ही जोडी आउट झाल्यावर पाकिस्तानच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण. त्यानंतर डॅरियल मिचेल 57 आणि टॉम लॅथम 56 यांच्या अर्धशतकीनं पाकच्या मनसुब्यांवर पाणी फेरले.