न्यूझीलंडचा गोड शेव, इंग्लंडचा 423 धावांनी धुव्वा; टीम साऊदीला संस्मरणीय निरोप

यजमान न्यूझीलंडने अखेरच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा 423 धावांनी धुव्वा उडवित मालिकेचा शेवट गोड केला. तीन सामन्यांची ही मालिका इंग्लंडने आधीच 2-0 अशी खिशात टाकली होती. मात्र, न्यूझीलंडने अखेरी कसोटीत धावांच्या बाबतीत कारकीर्दीतील मोठा विजय मिळवित टीम साऊदीला संस्मरणीय निरोप दिला. याआधीही न्यूझीलंडने 2018 मध्ये कसोटी सामन्यात श्रीलंकेवर 423 धावांच्या फरकाने विजय मिळवला होता.

पाहुण्या इंग्लंडने सुरुवातीचे दोन सामने जिंकत तीन सामन्यांची मालिका आधीच जिंकली होती. तिसऱया कसोटीत किवी संघाने प्रथम फलंदाजी करताना 347 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 35.4 षटकात 143 धावांवरच गारद झाला. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात 204 धावांची आघाडी मिळाली.न्यूझीलंडने दुसऱया डावात 453 धावसंख्या उभारून इंग्लंडला विजयासाठी 658 धावांचे मोठे लक्ष्य दिले. या धावांचा पाठलाग करताना काल इंग्लंडची 2 बाद 18 अशी अवस्था होती.

आज जेकब बेथेल (76) व जो रूट (54) यांनी अर्थशतके झळकावित न्यूझीलंडचे टेन्शन वाढविले होते. मात्र त्यानंतर मिचेल सँटनर, टीम साऊदीने इंग्लंडचा दुसरा डाव 47.2 षटकांत 234 धावांवर संपुष्टात आणला. अन् न्यूझीलंडने कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम विजय मिळविला. न्यूझीलंडकडून दुसऱया डावात मिचेल सँटनरने सर्वाधिक 4 फलंदाज बाद केले.

टीम साऊदीची निवृत्ती

किवी संघाचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने आपल्या 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला . न्यूझीलंडने अखेरच्या कसोटीत मोठा विजय मिळवत साऊदीला निवृत्तीची खास भेट दिली आहे. त्याने 776 आंतरराष्ट्रीय विकेट टिपल्या असून अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा एकमेव गोलंदाज होय. साऊदी हा सर्वाधिक कसोटी विकेटच्या (391) बाबतीत सर रिचर्ड हॅडलीनंतर (431) दुसऱया स्थानावर आहे. त्याने 164 टी-20, तर 221 एकदिवसीय विकेट टिपले आहेत.