नवीन वर्षाच्या स्वागताचा देवगड तालुक्यामध्ये उत्साह पहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विजयदुर्ग किल्ल्यावर नव वर्षानिमित्त दिपोत्सव सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. विजयुदर्ग जेटी येथून ढोल ताशांच्या गजरात लेझीम नृत्यासह, मर्दानी खेळांचे प्रात्याक्षिक सादर करून श्रीफळ फोडून उत्साहात दिपोत्सव सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला.
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या वतीने “दिपोत्सव 2025” या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी एक पणती मावळ्यांसाठी, एक दिवा सैनिकांसाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत 50 मशाली व 5000 दिव्यांनी किल्ले विजयदुर्ग उजळून निघणार आहे. या विशेष उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
दरम्यान, 31 डिसेंबर मध्यरात्री बाराच्या ठोक्यावर फटाक्यांची आतषबाजी करत हजारो नागिरांच्या उपस्थितीमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यात आले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था’ देवगड व जल्लोष समिती यांच्या मार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नवीन वर्षाचे स्वागत निर्विघ्नपणे पार पाडावे म्हणून देवगड पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सहा.पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस, होमगार्ड यांनी योग्य बंदोबस्त ठेवला होता.