सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातून रायगड जिल्ह्यात सुमारे तीन लाख पर्यटकांनी हजेरी लावली. पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांची अक्षरशः घुसमट झाली. सर्वच ठिकाणी नागरी सुविधांचा बोजवारा उडाला. पार्किंग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांसह गडकिल्ले, धार्मिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. मुंबईपासून जवळ असल्यामुळे दरवर्षी राज्यासह देश-विदेशातील लाखो पर्यटक सुट्टी हंगामात जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर हजेरी लावतात. यामुळे स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे, परंतु दुसऱ्या बाजूला स्थानिक नागरी सुविधांवर याचा प्रचंड ताण पडत आहे. रायगड जिल्ह्यातील मांडवा, किहिम, वरसोली, अलिबाग, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरुड, हरिहरेश्वर, दिवेआगर समुद्रकिनारे रायगड, कर्नाळा, जंजिरा यांसह इतर गडकिल्ले, अष्टविनायकांपैकी पाली व महड तसेच थंड हवेचे ठिकाण माथेरान येथे लाखोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावतात. नववर्ष स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झाल्याने जिल्ह्यात वाहतूक समस्या निर्माण झाली. स्थानिक प्रशासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या सुविधांवर त्याचा मोठा ताण पडला. परिणामी पर्यटकांना अनेक असुविधांचा सामना करावा लागला.
पर्यटनपूरक विकास आवश्यक
पर्यटन केंद्रांच्या पायाभूत विकासाला चालना देणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांत इथे पाच हजारांहून हॉटेल, लॉज आणि निवास, न्याहरी केंद्रे उभी राहिली आहेत, पण ज्या प्रमाणात पर्यटकांची आणि हॉटेलची संख्या वाढते आहे त्या प्रमाणात रस्ते, वीज, पाणी, पार्किंग, सार्वजनिक स्वच्छतागृह या सुविधा विकसित झालेल्या नाहीत. स्थानिक ग्रामपंचायती आणि नगरपालिकांचे उत्पन्न मर्यादित असल्याने या सुविधा विकसित करणे त्यांना शक्यही होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने या ठिकाणांचा पर्यटनपूरक विकास करणे गरजेच आहे, असे मत पर्यटन तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
एसटीची सेवाही अपुरी
नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात आले होते. बुधवारी व गुरुवारी जिल्ह्यातील प्रमुख आगारांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र आगारातून सुटणाऱ्या बहुतांश गाड्या आधीच आरक्षित झाल्याने प्रवासी मोठ्या प्रमाणात अडकून पडले. प्रवाशांची संख्या जास्त असल्याने एसटीची सेवाही अपुरी पडली.
जलवाहतुकीवर अतिरिक्त ओझे
अलिबाग हे मुंबईशी जलमार्गाने जोडले आहे. दररोज साधारणपणे तीन ते साडेतीन हजार प्रवासी जलमार्गाने प्रवास करतात. सुट्टीच्या दिवसांमध्ये ही संख्या दहा ते बारा हजारांच्या घरात झाते. सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात हजेरी लावत आहेत. नववर्ष स्वागतासाठी तर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले. पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन जादा प्रवासी बोटी सोडण्यात आल्या होत्या. मात्र त्या अपुऱ्या पडल्याने सोमवारी मांडवा बंदरात परतणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.