बदलापूरहून पनवेल परिसरात यायचे असेल तर सध्या लोकलने व्हाया डोंबिवली, ठाणे यावे लागते किंवा कर्जतमार्गे रस्त्याने पनवेल गाठावे लागते. यात जवळपास एक ते दीड तास लागतो. मात्र लवकरच प्रवाशांची होणारी ही फरफट थांबणार आहे. बडोदा- मुंबई महामार्गाच्या शेवटच्या पॅकेजमधील माथेरान डोंगररांगाखालील पहिल्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले असून दुसऱ्या बोगद्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. 25 जुलैपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता असल्याने नव्या वर्षात बदलापूरवरून पनवेल येथे अवघ्या वीस मिनिटांत येता येणार आहे.
1) दिल्लीला जोडणारा मुंबई- बडोदा महामार्ग पनवेल व नवी मुंबई विमानतळ तसेच जेएनपीएला जोडण्यात येणार आहे. या महामार्गामुळे पनवेल नगरीचे अर्थकारण बदलणार आहे. पुढील नऊ महिन्यांत या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंबर कसली आहे.
2) माथेरानच्या डोंगररांगामधील शिरवली गावालगत सुमारे सवाचार किलोमीटर अंतरावर दुहेरी बोगद्याचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच या महामार्गाचे शेवटच्या पॅकेज क्रमांक 17 चे सरासरी 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. यासाठी 1400 कोटी रुपये खर्च केला जात आहे.
3) पावसाळा संपल्यावर पुन्हा एकदा कामाने गती पकडली आहे. दुहेरी बोगदा आरपार करण्याचे काम ठरविलेल्या मुदतीपेक्षा अगोदर पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. पॅकेज क्रमांक 17 हा 9.6 किलोमीटर अंतराचा असून बदलापूरच्या भोज गावापासून ते पनवेलमधील मोरबे गावापर्यंत हा रस्ता बांधला जाणार आहे.
4) 4.39 किलोमीटरचे दुहेरी बोगदे माथेरान डोंगररांगाखालून खोदले आहेत. 13 मीटर उंच आणि 23 मीटर रुंदीच्या या दुहेरी बोगद्यात आठ वेगवेगळ्या मार्गिका असतील.
निधीअभावी विरार-अलिबाग मार्गिकचे काम लटकले
बडोदा-मुंबई महामार्ग विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकला पनवेलच्या मोरबे गावाजवळ जोडला जाणार आहे. मात्र विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी निधीची अडचण निर्माण झाल्याने भूसंपादनच काम रखडले आहे. मोरबे ते कोन गावापर्यंत हे काम एमएसआरडीसी करणार होते. त्यासाठी निविदा प्रक्रिया पार पडली. एमएसआरडीसीने मोरबे गावातील अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम दिली. मात्र मोरबे गावानंतर अनेक गावांचे भूसंपादन रखडल्याने या बहुउद्देशीय मार्गिकच्या कामाचा श्रीगणेशा होऊ शकला नाही.