
उद्या 1 एप्रिल 2025पासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. नव्या वर्षापासून बँकिंगपासून जीएसटीपर्यंत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. हे बदल झाल्यानंतर सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मंगळवारपासून बँकिंग, जीएसटी, इंकम टॅक्स, डिजिटल पेमेंटमधील बदल, एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल, नव्या टॅक्स नियमात बदल झालेले दिसतील. 1 एप्रिलपासून बचत खाते आणि एफडीच्या व्याज दरात बदल केला जाणार आहे. एसबीआय बँक, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक, आयडीबीआय बँकेने आपल्या एफडी आणि स्पेशल एफडीच्या व्याज दरात बदल केले आहेत.
मिनिमम बॅलंस – 1 एप्रिलपासून बँकेतील बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलंस आधीच्या तुलनेत जास्त ठेवणे आवश्यक होणार आहे. जर बँकेत पुरेसे बॅलंस नसेल तर बँक खातेदारांना दंड द्यावा लागेल. वेगवेगळ्या बँकेच्या दंडाची रक्कम ही वेगवेगळी असू शकते.
यूपीआय – नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) इनऑक्टिव्ह असलेल्या मोबाईल अकाऊंटमधील यूपीआय ट्रांझक्शन बंद करणार आहे.
एफडी – ज्येष्ठ नागरिकांच्या एफडी आणि आरडीप्रमाणे अन्य बचत खात्यांतील योजनेतील 1 लाखांपर्यंतच्या व्याजावर कोणताही टीडीएस कापला जाणार नाही. याआधी ही रक्कम 50 हजार रुपये होती.
पॅन-आधार लिंक – शेअर मार्पेटमधील डिव्हिडेंड मिळवण्यासाठी पॅन-आधार लिंक आवश्यक आहे.
डीमॅट अकाऊंट – सेबीने म्युच्युअल फंड आणि डीमॅट अकाऊंट उघडण्यासाठी नियमात बदल केले आहेत.
कार खरेदीसाठी मोजावे लागणार जादा पैसे
हिंदुस्थानात उद्या, 1 एप्रिलपासून नवीन कार खरेदी करणे महाग होणार आहे. कंपन्यांनी कारच्या किमती वाढवणार असल्याची घोषणा याआधीच केली आहे. त्यामुळे नवी कार खरेदी करायचे असल्यास उद्यापासून जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मारुती सुझुकी 4 टक्क्यांपर्यंत, किआ मोटर्स 3 टक्क्यांपर्यंत, ह्युंदाई 3 टक्क्यांपर्यंत, रेनोच्या कार 2 टक्क्यांपर्यंत, महिंद्रा कारच्या किमती 3 टक्क्यांपर्यंत वाढणार आहेत. टाटा मोटर्सच्या कारच्या किमती किती टक्क्यांपर्यंत वाढणार हे पंपनीने अद्याप जाहीर केले नाही. स्टील, अॅल्युमिनियम आणि अन्य कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने तसेच उत्पादन आणि डिलिव्हरी चार्ज वाढल्याने कारच्या किमती वाढण्याची वेळ आली आहे, असे कंपन्यांचे म्हणणे आहे.