रत्नागिरीत नवा विक्रम! ‘शतसंवादिनी’ या अनोख्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध

संवादिनीगंधर्व म्हणून ओळख असलेले स्वर्गीय पंडीत गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सहयोग आणि चैतन्यस्वर यांनी आयोजित केलेल्या शतायुषी गोविंदराव या हार्मोनियम सिंफनी तब्बल शंभर संवादिनी वादकांच्या स्वरातून रंगली.शतसंवादिनी कार्यक्रमातून गोविंदराव पटवर्धन यांच्या स्मृती जागवल्या गेल्या. शनिवारी ‘शतायुषी गोविंदराव’ हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर वि. दा .सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये रत्नागिरी व मुंबई येथील 100 हून अधिक हार्मोनियमवादकांनी एकच वेळी एकाच रंगमंचावरून ‘शतसंवादिनी’ या अनोख्या कार्यक्रमाद्वारे गोविंदरावांना आदरांजली वाहिली.

सहयोग आणि चैतन्यस्वर रत्नागिरीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मुंबईमधील सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक, संगीतकार अनंत जोशी यांच्या संगीत संयोजनाखाली रत्नागिरीतील विजय रानडे, संतोष आठवले, महेश दामले, मंगेश मोरे, श्रीधर पाटणकर, चैतन्य पटवर्धन, हर्षल काटदरे, चंद्रकांत बांबर्डेकर हे संवादिनीवादक आणि त्यांचे शिष्य सहभागी झाले होते. आदित्य पानवलकर, प्रथमेश शहाणे, प्रणव दांडेकर हे तबला व पखवाजसाथ, तर शिवा पाटणकर आणि अद्वैत मोरे यांनी तालवाद्याची साथ दिली. निबंध कानिटकर आणि दिप्ती कानविंदे यांच्या बहारदार निवेदनाने रंगत आणली.सहयोगचे अध्यक्ष दुर्गेश आखाडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे संयोजक अनंत जोशी,चैतन्य पटवर्धन आणि प्रमोद मराठे यांचा सत्कार करण्यात आला. सहयोगचे कार्यकारिणी सदस्य दत्ता केळकर यांच्याहस्ते कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात काही शास्त्रीय रचनांसोबत अभंग, गजर, ठुमरी आदी प्रकार संवादिनीवर सादर केले.तसेच पं. गोविंदराव पटवर्धन यांच्यावरील माहितीपट आणि त्यांच्याविषयी मान्यवरांच्या प्रतिक्रिया प्रसारित करण्यात आल्या.