रस्ते बांधणीवर प्रचंड खर्च; टोल लागणारच

सरकार लवकरच राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांसाठी नवीन धोरण जाहीर करणार असून ग्राहकांना विशेष सवलत देण्यात येईल, असे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज स्पष्ट केले. रस्ते बांधणीवर सरकार प्रचंड पैसा खर्च करते. त्यामुळे टोल आकारावाच लागेल, असेही गडकरी म्हणाले. राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. जर तुम्हाला चांगले रस्ते हवे असतील तर त्यासाठी पैसे द्यावेच लागणार आणि हेच रस्ते व वाहतूक मंत्रालयाचे धोरण आहे, असे नितीन गडकरी यांनी नमूद केले.

आसाममध्ये सरकार रस्ते बांधणीवर तब्बल 3 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. आम्ही पुष्कळ मोठे रस्ते आणि चार पदरी तसेच सहा पदरी रस्त्यांची निर्मिती करत आहोत. मी ब्रम्हपुत्रापासून अनेक ठिकाणी अनेक पूल उभारले. त्यासाठी बाजारातून निधी उभा करतो. त्यामुळे टोलशिवाय हे शक्य होणार नाही. परंतु आम्ही केवळ चार पदरी रस्त्यांसाठी टोल आकारतो, दुपदरी रस्त्यांसाठी नाही, असेही गडकरी म्हणाले.