अमेरिका पुन्हा दहशतवादी हल्ल्याने हादरली; नववर्षाचा जल्लोष सुरू असताना गर्दीत ट्रक घुसवला, 10 ठार

अमेरिकेतील लुईझियाना येथील न्यू ऑर्लिन्स शहरात बोर्बेन रोडवर एका हल्लेखोराने नववर्षाचा जल्लोष सुरू असतानाच गर्दीत पीकअप ट्रक घुसवला. या घटनेत 10 ठार तर 35 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोर लोकांना चिरडत पुढे गेला. रस्त्यावर सर्वत्र रक्ताचा सडा आणि मृतदेह दिसत होते. जिकडे तिकडे किंकाळय़ा आणि आक्रोश ऐकू येत होता. हल्लेखोराने ट्रकमधून उतरून अंदाधुंद गोळीबारही केला. त्यात दोन पोलीस अधिकारी जखमी झाले. दरम्यान, शमशुद्दीन बहार जब्बार असे हल्लेखोराचे नाव असून त्याला ठार मारण्यात आले आहे. ट्रकमध्ये इस्लामिक स्टेटचा झेंडा आढळला. हा दहशतवादी हल्ला असल्याचे पुरावे हाती लागले आहेत.

भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी ही घटना घडली. हा हल्ला नियोजनबद्धपणे करण्यात आल्याचे पोलिस प्रवत्त्याने म्हटले आहे. तर न्यू ऑर्लिन्सच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावा केला आहे. जखमींना शहरातील 5 रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी सापडली स्फोटके

घटनास्थळी इप्रोव्हायइड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस सापडल्याचे एफबीआय एजंट डंकन यांनी सांगितले. नागरिकांना तत्काळ घटनास्थळापासून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

ट्रकमध्ये सापडला इस्लामिक स्टेटचा झेंडा

हल्लेखोराच्या ट्रकमध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा झेंडा गुंडाळून ठेवल्याचा आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे हल्लेखोराचे इस्लामिक स्टेटशी काही कनेक्शन आहे का? याचाही आता शोध घेतला जात आहे.