इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मुले आणि किशोरवयीन मुलांवर नकारात्मक परिणाम होतो. याबद्दल जगभरात सातत्याने चर्चा सुरू असते. अशातच इन्स्टाग्रामने अल्पवयीन मुलांसाठी नवीन फीचर आणलंय. ‘मेटा’ कंपनीने इन्स्टाग्राम युजर्ससाठी नवीन प्रायव्हसी आणि पॅरेंट कंट्रोल्स रोलआऊट केले आहेत.
‘मेटा’नं म्हटलंय की, 18 वर्षांखालील युजर्सना अकाऊंट आपोआप ‘टीन अकाऊंट’ असे समजले जाईल. जी मुलं ‘टीन अकाऊंट’ला फॉलो करतात किंवा कनेक्ट करतात तेच त्यांना मेसेज किंवा टॅग करू शकतील. याशिवाय इन्स्टाच्या कंटेंटसाठी सेन्सिटिव्हिटी सेटिंग्जही असतील. यामुळे अश्लील किंवा संवेदनशील कंटेंट या टीन अकाऊंट युजर्सना दिसणार नाही. परिणामी मुले अश्लील कंटेंटपासून दूर राहू शकतात.
अलीकडे मोठ्या प्रमाणात अश्लील कंटेंट सोशल मीडियावर दिसून येतो. हे अल्पवयीन मुलांच्या नजरेस पडू नये यासाठी पालक सतर्क असतात, पण आता टीन अकाऊंट हे असा कंटेंट मुलांपर्यंत जाऊच देणार नाही. त्यामुळे पालकांची चिंता एकप्रकारे दूर होईल.
पालकांच्या मदतीनेच सेटिंग्ज बदलू शकाल
16 वर्षांखालील युजर्स त्यांची डिफॉल्ट सेटिंग्ज बदलू शकत नाहीत. या टीन युजर्सना सेटिंग्ज बदलण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. याशिवाय पालकांना खास सेटिंग्जही देण्यात येत आहेत. यामुळे ते अॅपमध्ये आपल्या मुलांना ऑक्टिव्हिटीचा मागोवा घेऊ शकतील. आपली मुले कोणाशी संवाद साधत आहेत आणि कोणाशी बोलत आहेत, हे पालक समजू शकते. या अकाऊंटचा वापर मर्यादित ठेवण्याचा पर्याय पालकांना मिळतो.