मेहताने 70 कोटी जैनला तर 40 कोटी अरुणभाईला दिले, तिसरा आरोपी अरुणभाईचा शोध सुरू

आपल्या पदाचा गैरवापर करत न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींचा अपहार करणाऱ्या हितेश मेहता याने बांधकाम व्यावसायिक धर्मेश जैन याला 70 कोटी तर सोलार कॅनलचा व्यवसाय करणाऱ्या उन्ननाथन अरुणाचमल ऊर्फ अरुणभाई याला 40 कोटी दिल्याचे समोर आले आहे. मेहता आणि जैन यांना अटक झाली, पण अरुणभाई अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अरुणभाई हा एका पक्षाशी संबंधित असल्याचे समजते. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

न्यू इंडिया सहकारी बँकेचा जनरल मॅनेजर अॅण्ड हेड अकाऊंटंटस या पदाचा गैरवापर करत हितेश मेहता याने प्रभादेवी आणि गोरेगाव शाखेतील मिळून 122 कोटींचा मेहताने अपहार केला. त्यात प्रभादेवी शाखेतील 112 कोटी तर गोरेगाव शाखेतील 10 कोटींचा समावेश आहे. वर्ष 2019 ते 2024 या कालावधीत हा पैशांचा झोल करण्यात आला. गुन्हे शाखेने या गुह्याचा म्होरक्या हितेश मेहता याला बेडय़ा ठोकल्या आहेत.

जैनकडून मोबदल्यात मोठे काहीतरी मिळणार होते

वर्ष 2016 मध्ये मेहता याने जैनकडून एक फ्लॅट विकत घेतला होता. तेव्हापासून दोघांची ओळख झाली. त्यानंतर मेहताने फौजदारी कट रचून 2019 पासून बँकेतील जमा रकमेपैकी शक्य होईल तशी रोकड घेऊन ती जैनला देण्यास सुरुवात केली. जैनचा चारकोप येथे एसआरए प्रकल्प असून तेथे उभ्या राहणाऱ्या टॉवरमधील मोठय़ा क्षेत्रफळाचा फ्लॅट मेहताला तो देणार होता असे सूत्रांकडून सांगण्यात येते.

मेहता गोरेगाव व प्रभादेवी येथील रोकड मागवून घ्यायचा. ती रोकड तो प्रभादेवी येथील त्याच्या कार्यालयात ताब्यात घ्यायचा. मग संध्याकाळी कारने आपल्या घरी घेऊन जायचा. मग दुसऱ्या दिवशी ती रोकड मेहता मध्यस्थाला द्यायचा.

मेहता एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ठेवण्यासाठी पैसे घेऊन येण्यास सांगायचा. त्याप्रमाणे प्रभादेवी शाखेतून पैसे घेतल्यानंतर तेथे आऊटची एण्ट्री केली जायची. पण गोरेगाव शाखेत इनची एण्ट्रीच केली जायची नाही. वर्ष 2019 ते 2024 या कालावधीत मेहताने अशाचप्रकारे झोल केला.

सर्वांची चौकशी होणार

पाच वर्षांहून अधिक काळ मेहताने हळूहळू करून बँकेतील 122 कोटींचा अपहार केला. ही बाब बँकेतील रकमेचे ऑडिट करणाऱ्याच्या लक्षात कशी आली नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे पोलीस सर्वांगाने चौकशी करीत आहेत.