
न्यू इंडिया बँकेवर रिझर्व्ह बॅंकेने तडकाफडकी निर्बंध घातल्याने हजारो ठेवीदार चिंतेत पडले आहेत. या सर्व ठेवीदारांनी एकतेची वज्रमूठ करून सत्ताधाऱयांविरोधात आज आक्रोश व्यक्त केला. कष्टाचे पैसे परत मिळवण्यासाठी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केला. भारतीय जनता पक्षाने रिझर्व्ह बँकेच्या मदतीने आमची बँक बुडवली. या कारस्थानामागे भाजपा आमदार राम कदम यांचा हात असून त्यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे. जिवाची पर्वा न करता घोटाळेबाजांविरुध्द रस्त्यावर आणि न्यायालयातही लढणार, सत्ताधाऱयांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सर्वसामान्य कामगार, कष्टकऱयांची बँक अशी ओळख असलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार रिझर्व्ह बँकेने गुरुवारी रात्री अचानक थांबवले. ठेवीदारांना कुठलीही आगाऊ कल्पना न देता सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले. त्यामुळे मुंबई-ठाण्यातील हजारो ठेवीदारांमध्ये घबराट पसरली. निर्बंध लादल्याच्या दुसऱयाच दिवशी बँकेतील 122 कोटी रुपयांच्या घोटाळय़ाची तसेच भाजप आमदार राम कदम यांच्या दबावातून केलेल्या नियमबाह्य कर्जवाटपाची पोलखोल झाली. या पार्श्वभूमीवर ठेवीदार तातडीने आंदोलनात्मक पवित्रा आणि कायदेशीर लढय़ाची दिशा ठरवण्यासाठी गोरेगाव पश्चिमेकडील केशव गोरे स्मारक ट्रस्टमध्ये एकत्र जमा झाले. बैठकीला गोरेगावच्या स्थानिक ठेवीदारांसह दादर, अंधेरी, बोरीवली, कांदिवली, मीरा रोड, ठाणे अशा विविध भागांतून जवळपास 200 हून अधिक ठेवीदार होते.
आरबीआयने विश्वासार्हता गमावलीय!
न्यू इंडिया बँकेतील 122 कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. हे फक्त घोटाळय़ाचे हिमनग आहे. त्याच्याखाली कित्येक करोडोंचा घपला केला असेल हे अजून उघडकीस आलेले नाही. भाजप आमदार राम कदम यांनी बँकेच्या व्यवस्थापनावर दबाव टाकून बेकायदेशीरपणे कर्ज द्यायला भाग पाडली. हे भाजपवाले आणि बँकवाल्यांचे षड्यंत्र आहे. पोलिसांनी महाव्यवस्थापक हितेश मेहताला अटक केली. इतरांवर गुन्हे का दाखल केले नाहीत? आरबीआयची भूमिका पूर्णपणे शंकास्पद आहे. आरबीआयने व्श्वासार्हता गमावलेय, असा आरोप काँग्रेस नेते युवराज मोहिते यांनी केला.
आरबीआय ठेवीदारांना पाच लाखांत गुंडाळतेय!
1961 च्या डिपॉझिट इन्शुरन्स अॅण्ड व्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अॅक्टच्या कलम 16 मधील तरतुदीनुसार कोणतीही बँक बंद करताना ठेवीदारांना त्यांचे संपूर्ण पैसे परत करण्याची आरबीआयची जबाबदारी आहे. असे असताना आरबीआय केवळ पाच लाख देतो, असे सांगते. ते कधी देणार, तेही सांगत नाही. ठेवीदारांना केवळ पाच लाख रुपये देऊन गुंडाळतेय, असा आरोप बँकिंगतज्ञ विश्वास उटगी यांनी केला.
जॉर्ज फर्नांडिस यांनी बँक सुरू केली तेव्हापासून आम्ही बँकेसोबत आहोत. बँक चांगली होती. पण आता आलेल्या ‘बाबा’ लोकांनी आमच्या बँकेची वाट लावली. मी एकटीच राहते. शिलाईकाम करून जमवलेले 15 लाख रुपये बँकेत ठेवले होते. त्याच्यावरील व्याजाने आजारपणावरील औषधे घेत होती. माझे पैसे बुडाले. आता मी काय करू? – मुनीरा इब्जी, गोरेगाव
मी विधवा असून घरकाम करून माझे कुटुंब सांभाळते. माझ्या सासऱयांनी बँकेत 11 लाख रुपये एफडी म्हणून ठेवले होते. बँकेतील घोटाळय़ामुळे ते पैसे आता मिळणार की नाही, याची धाकधूक वाटतेय. एफडीवर मिळणाऱया व्याजाच्या पैशांतून कुटुंबाच्या बऱयाच गरजा भागवत होते. आता घरकामातून मिळणाऱ्या पैशांतून कसे जगायचे, हा प्रश्न सतावतोय. – नीलिमा मढवी, मालाड
ठेवीदारांची पोलीस ठाण्यावर धडक
भाजपचे आमदार राम कदम हे न्यू इंडिया बँकेचा व्यवहार ‘शॅडो कॅबिनेट’ म्हणून पाहत होते. त्यांनी स्वतः कर्जे लाटली तसेच दबाव टाकून इतरांना कर्जे द्यायला लावली. याप्रकरणी राम कदम यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करावा, घोटाळ्यातील त्यांच्या सहभागाची चौकशी व्हावी तसेच इतर जबाबदार लोकांवर कारवाई करून ठेवीदारांचे पैसे परत मिळवून द्यावे, अशी मागणी करीत ठेवीदारांनी गोरेगाव पोलीस ठाण्यावर धडक दिली आणि कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले. यात वृद्ध नागरिक, महिलांचाही समावेश होता. बँकेवर दिवसाढवळय़ा दरोडा पडला असताना सरकार, आरबीआय मूग गिळून गप्प का, असा सवाल ठेवीदारांनी यावेळी केला.
कष्टाचे पैसे परत मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात लढा देणार
ठेवीदारांना हक्काचे पैसे मिळवण्यासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर पर्यायांची माहिती यावेळी देण्यात आली. त्याचबरोबर ठेवीदारांच्या वतीने स्वतः मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याची तयारी उटगी यांनी दाखवली. आधी रस्त्यावरची लढाई लढू, सरकार व आरबीआयला जाब विचारू, त्यातून वेळीच सर्व पैसे मिळाले नाही तर न्यायालयीन लढाई लढू, आज नही तो कल… ठेवीदारांचे पैसे मिळालेच पाहिजेत, कोर्टाच्या लढाईत हे शक्य आहे, असे ते म्हणाले.
ठेवीदारांच्या मेळाव्यात बँकिंगतज्ञ विश्वास उटगी, भूषण ठाकूर, काँग्रेस नेते युवराज मोहिते, ‘आप’चे पदाधिकारी धनंजय शिंदे यांनी ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळवण्यासाठी एकत्रित व न्यायालयीन लढा देण्याचे आवाहन केले.
जॉर्ज फर्नांडिस यांनी अवघ्या एक रुपयात खाते उघडू शकणारी ही बँक सुरू केली होती. विश्वासाच्या भक्कम पायावर ती उभी राहिली होती. बेस्ट कामगार, महापालिका कर्मचारी, व्यापारी, सर्वसामान्यांना बँकेने मोठा आर्थिक आधार दिला.
आता लढा रस्त्यावर… आरबीआयवर मोर्चा
आता रस्त्यावर उतरून लढा देणार, असा इशारा ठेवीदारांनी दिला. आरबीआयवर हजारो ठेवीदारांचा मोर्चा काढण्याची तयारीही त्यांनी सुरू केली आहे. आता आपल्या हक्कासाठी लढाई लढावीच लागेल, बँकेतून 122 कोटींची रक्कम लंपास कशी काय केली जाऊ शकते, असा सवाल भूषण ठाकूर यांनी केला. मुंबई, ठाण्यात जागोजागी बैठका घेण्यात येणार आहेत. तसेच पोलीस ठाण्यांमध्ये निवेदने दिली जाणार आहेत.