न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांचा शनिवारी वर्सोव्यात मेळावा

मुंबई ग्राहक पंचायत आणि शिक्षणमहर्षी अजय कौल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी सायंकाळी 4 वाजता न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांना मार्गदर्शन करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर, यारी रोड, वर्सोवा येथे करण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया सहकारी बँकेच्या कारभारात गैरव्यवहार आढळल्याने या बँकेच्या ठेवीदारांना येत्या सहा महिन्यांत त्यांच्या ठेवी काढून घेण्यास बंदी जाहीर केली आहे. त्यामुळे असंख्य सर्वसामान्य ठेवीदारांना, अनेक गृहनिर्माण संस्थांना, शैक्षणिक संस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागतेय. यावर रिझर्व्ह बँकेने तात्पुरती 25 हजार रुपयाची रक्कम काढण्याची दिलेली सवलत कुचकामी असल्याचे अनेक ठेवीदारांचे म्हणणे आहे. बँकेतील व्यवस्थापनाच्या गैरव्यवहाराची किंमत बँकेच्या ठेवीदारांनी का मोजायची, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. पाच लाखांपर्यंतच्या ठेवी जरी ठेवीदारांना परत मिळणार असल्या तरी ज्या ठेवीदारांच्या पाच लाखांपेक्षा जास्ती ठेवी असतील त्यांचे भवितव्य काय, असाही प्रश्न सर्वसामान्य ठेवीदारांना भेडसावतोय.

या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या सभेला मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे, संस्थेच्या विधी मार्गदर्शक शर्मिला रानडे तसेच चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर या शाळेचे संस्थापक विश्वस्त आणि शिक्षणमहर्षी अजय काwल हे मार्गदर्शन करणार आहेत. न्यू इंडिया बँकेच्या ग्राहकांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे कार्यवाह अनिता खानोलकर यांनी केले आहे.