न्यू इंडिया अपहार प्रकरण; बँकेशी संबंधित एक वरिष्ठ अधिकारी रडारवर, मेहता, पौन आणि भोन यांना 28 फेबुवारीपर्यंत पोलीस कोठडी

न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर बँकेशी संबंधित एक वरिष्ठ अधिकारी आला आहे. या गुह्यात त्या अधिकाऱ्याचाही सहभाग निश्चित होत असल्याने त्याला लवकरच अटक होईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.

बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत  बँकेचा माजी जनरल मॅनेजर अकाऊंट्स हितेश मेहता, मेहताने 70 कोटी रुपये दिलेत तो बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन आणि बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू भोन अशा तिघांना बेडय़ा ठोकल्या आहेत.  तपास पथक अरुणभाई याचा शोध घेत आहे. हितेश मेहता याने अरुणभाईला 40 कोटी रुपये दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पोलीस अरुणभाईचा शोध घेत आहेत. दरम्यान, बँकेशी संबंधित एक माजी अधिकारी पोलिसांच्या रडारवर आला आहे. त्या अधिकाऱ्यांचादेखील सहभाग या प्रकरणात असल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे त्यालाही अटक होईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. हितेश मेहता, धर्मेश पौन आणि अभिमन्यू भोन यांना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

20 कोटी ठेवण्याची क्षमता, मग 135 कोटी होते का?

बँकेच्या प्रभादेवी व गोरेगाव येथील तिजोरीत 20 कोटींची रोकड ठेवण्याची क्षमता असून तेवढीच रक्कम ठेवण्याची परवानगीदेखील होती. मग असे असताना 130 हून अधिक कोटींची रोकड बँकेत ठेवण्यात आली होती का? तेवढी रक्कम ठेवली होती तर त्यासाठी परवानगी होती का? तसेच आरबीआय अधिकाऱ्यांनी जेव्हा तिजोऱ्यांची तपासणी केली तेव्हा बँक रिटेन्शननुसार 20 कोटींहून कमी रोकड तिजोऱ्यांमध्ये आढळून आली होती. त्यामुळे सह आयुक्त निश्चित मिश्रा, उपायुक्त मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी आवारी हे या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.