
कोट्यवधी रुपयांच्या तोटय़ामुळे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक डबघाईला आली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी बँकेचे माजी अध्यक्ष रणजित भानू आणि त्यांचा मुलगा हिरेन यांच्याशी संधान साधून कष्टकरी कामगारांच्या श्रमातून उभी राहिलेली न्यू इंडिया बँक लुटली. आमदार राम कदम यांनी संचालक मंडळावर नियमबाह्य कर्जासाठी दबाव टाकून कोटय़वधी रुपयांची कर्जे भाजपशी संबंधितांना दिली. ज्यांनी बँकेकडून कर्ज उचलली त्यांनी कर्जाची परतफेड केलीच नाही. हे कमी म्हणून की काय, राम कदम यांनी बँकेच्या शाखांसाठी स्वतःच्या मालकीचे चेंबूर, घाटकोपर व मुंबई उपनगरातील काही ठिकाणचे गाळे अवाचेसवा भाडय़ाने बँकेच्या माथी मारले. या सगळय़ामुळे न्यू इंडिया बँक डबघाईला आल्याचे उघड झाले आहे.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने अचानक निर्बंध लादल्याने बँकेतील ठेवीदार आणि खातेदार हवालदिल झाले आहेत, मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून या बँकेत गडबड सुरू झाली होती, हे बँकेने सादर केलेल्या वार्षिक अहवालावरून समोर येत आहे. बँकचे संस्थापक रणजित भानू सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांचा मुलगा संचालक मंडळात आला आणि त्याने भाजप आमदार राम कदम यांच्या मदतीने अन्य लोकांशी संधान बांधून न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचा कारभार नासवला. भाजप आमदार राम कदम यांचाही बँक आर्थिक डबघाईला येण्याशी थेट संबंध असल्याचे बोलले जात आहे.
ठेवीवरील व्याजावरच बँकेचा नफा असतो, मात्र या बँकेत कर्जबुडीचे प्रमाण वाढले. संचालक मंडळ भ्रष्टाचारी झाले. बुडीत कर्जाचा टक्का पाच टक्केच्या पुढे जाताच बँक धोक्यात असल्याचे आरबीआय मानते, पण न्यू इंडिया को-ऑप. बँकेत हे प्रमाण 15 टक्क्यांच्या वर गेले असल्याची शक्यता उटगी यांनी व्यक्त केली आहे. याला बँकेतीलच सर्व मंडळ जबाबदार असल्याचा आरोप बँपिंगतज्ञ विश्वास उटगी यांनी व्यक्त केला आहे. 2020 नंतर महाराष्ट्रात जवळपास 150 को-ऑप. बँका बंद पडल्या आणि देशात 250 पेक्षा जास्त बँका बुडाल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी दोन बँकांना दंड
नियमांचे उल्लंघन करणाऱया नैनिताल बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स या दोन बँकांना रिझर्व्ह बँकेने 68.1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नैनिताल बँक लिमिटेडला कर्जावरील व्याजदर आणि बँकांमधील ग्राहक सेवेबाबत काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल 61.40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय आरबीआयने जारी केलेल्या काही नियमांचे पालन न केल्यामुळे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेला 6.70 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने दुर्लक्ष केले
2022-2023 मध्ये 30 कोटींचा तोटा बँकेला दिसतोय. हे सर्व रिझर्व्ह बँकेच्या ऑडिटमध्ये रिपोर्टमध्ये असताना त्याकडे दुर्लक्ष का केले गेले? रिझर्व्ह बँकेने आता जे निर्बंध आणले ते आधीच का आणले नाहीत, असा सवाल विश्वास उटगी यांनी केला आहे.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचा कामगार वर्गाबाबत जो जिव्हाळा होता तो आता राहिलेला नाही. बँकेच्या संचालक मंडळात असताना रणजीत भानू यांच्या मुलाने केले कर्जव्यवहार हे अत्यंत संशयास्पद आहे. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेला माहीत असतानाही राजकीय दबावापोटी संचालक मंडळावर कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून येत असल्याचे विश्वास उटगी म्हणाले. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक मंडळ हे भाजप नेत्यांच्या प्रभावाखाली काम करते हे स्पष्ट आहे. भाजप नेत्यांकडून सल्ले घेऊन लोकांना नियमबाह्य कर्जवाटप केले गेले. प्रत्यक्ष सही करण्यात त्यांचा संबंध नसला तरी त्यांच्या प्रभावाखाली काम सुरू आहे. ही कर्जे घेणाऱयांमध्ये भाजपच्या नेतेमंडळींचे नातेवाईकही आहेत, असे विश्वास उटगी म्हणाले.
बँकेचे चेअरमनपद दोन वर्षांपासून रिक्त
सुरुवातीच्या काळात रणजीत भानू बँकेचे चेअरमन आणि हिरेन भानू व्हाईस चेअरमन होते. त्यानंतर हिरेन भानू यांनी बँकेचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला. बँकेच्या वेबसाइटवर जे वार्षिक अहवाल अपलोड केले आहेत त्यानुसार 2023 ला सतीश चंदेर हे चेअरमन तर गौरी भानू या व्हाईस चेअरमन होत्या, मात्र 25 एप्रिल 2023 पासून पुढे बँकेला चेअरमनपदच नव्हते आणि गौरी भानू या व्हाईस चेअरमन म्हणून सगळा कारभार सांभाळत असल्याचे दिसत आहे. तर फेड्रिक डिसोझा, कुरुष पाघडीवाला, मिलन कोठारे, शिवा कथुरिया, विरेन बरोट हे डायरेक्टर म्हणून कार्यरत होते, मग गेली दीड ते दोन वर्षे बँकेचे चेअरमनपद रिक्त का होते, असा प्रश्न निर्माण होत आहे.
आरबीआयने परिस्थिती लपवून का ठेवली? विश्वास उटगी यांचा सवाल
न्यू इंडिया को-ऑप. बँकेचा कारभार गेल्या पाच वर्षांपासून भाजपच्या हातात गेलाय का? न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे सध्याचे संचालक मंडळ अत्यंत बेजबाबदार आहे. त्यांच्यामुळेच ही बँक बुडाली आहे. बँकेची परिस्थिती इतकी वाईट होती तर रिझर्व्ह बँकेने ती मागची पाच वर्षे लपवून का ठेवली? गेल्या पाच वर्षांत लोकांच्या डोळय़ात धूळफेक करण्याचे काम बँकेचे संचालक मंडळ आणि आरबीआयने केले आहे, असे बँपिंग तज्ञ विश्वास उटगी म्हणाले.
न्यू इंडिया को-ऑप. बँकेचा कारभार गेल्या पाच वर्षांपासून भाजपच्या हातत गेलाय आणि ज्या कर्जदारांनी कर्जे उचलली ती परतच केली नाहीत. त्याकरिता प्रत्यक्ष संचालक मंडळात रणजित भानू यांचा मुलगा आणि सून आणखी दोन-तीन लोक जबाबदार आहेत. बँकेचे सध्याचे संचालक मंडळ भाजपशी संबंधितांच्या दबावाखाली येऊन काम करत आहे, असे उटगी यांनी सांगितले.
ठेवीदारांची गोरेगावमध्ये आज बैठक
पश्चिम उपनगरातील न्यू इंडिया को-ऑप. बँकेच्या ठेवीदारांची बैठक रविवार, 16 फेब्रुवारी रोजी केशव गोरे स्मारक ट्रस्ट, गोरेगाव (पश्चिम) येथे सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पाच लाखांवरील ठेवी कशा मिळविता येतील याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच यापुढील न्यायालयीन, रस्त्यावरील लढाईच्या दृष्टीने चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती विश्वास उटगी यांनी दिली.