
न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या सात संचालकांना समन्स बजावला होता. त्यानुसार सहा संचालकांनी तपास पथकाला प्रतिसाद दिला. आम्हाला ऑडिट रिपोर्ट दाखवून सर्व ठीक असल्याचे सांगितले जायचे. त्यामुळे 122 कोटी अपहाराची आम्हाला माहिती नसल्याचे त्या संचालकांचे म्हणणे असल्याचे सांगण्यात येते.
122 कोटींच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यात माजी जनरल मॅनेजर हितेश मेहता, बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन, माजी सीईओ अभिमन्यू भोन आणि फरार आरोपी अरुणाचलमचा मुलगा आणि गुह्यात सहभागी असलेला मनोहर यांचा समावेश आहे. या गुह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तपास पथकाने बँकेच्या संचालकांना समन्स बजावले होते. त्या समन्सला सहा संचालकांनी प्रतिसाद दिला. आम्हाला या 122 कोटींच्या अपहाराची काहीच माहिती नाही. ऑडिट दाखवून सर्व ठीक असल्याचे सांगितले जायचे, असे त्यांचे म्हणणे असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.
मनोहर म्हणतो, मी मेहताला कर्ज दिले
मेहताने 40 कोटी अरुणाचलमला दिले होते. मालाड येथील अरुणाचलमचा मुलगा मनोहर याच्या कार्यालयात हे पैसे देण्यात आले होते. तेव्हा तिथे मनोहरदेखील उपस्थित होता. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली. पण आता मीच मेहताला काही रक्कम कर्ज दिले, असे मनोहरचे म्हणणे असल्याचे सांगण्यात येते.
अरुण भाई सापडेना
किती चलाख आणि सराईत गुन्हेगार असला तरी त्याला कुठूनही शोधून गजाआड धाडण्यात हातखंडा असलेल्या मुंबई पोलिसांना एक सोलार पॅनलचा व्यावसायिक सापडत नसल्याचे चित्र आहे. अरुणाचलम सापडत नाही की त्याला जाणीवपूर्वक पकडले जात नाही, अशी उलटसुलट चर्चा पोलीस दलात रंगली आहे.