आरोपींची फॉरेन्सिक सायकोलॉजिकल चाचणी, मनोहर अरुणाचलमला अटक

न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळ्यातील आणखी एक आरोपी अरुणाचलम मारुतवार याचा मुलगा मनोहर (32) याला अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी पैसे मिळाल्याचे नाकारत असल्याने पोलिसांच्या मागणीवरून आरोपींची फॉरेन्सिक सायकोलॉजिकल चाचणी करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

बँकेतला 122 कोटींचा अपहार उघडकीस आल्यानंतर मालाड येथे राहणारा अरुणाचलम आणि त्याचा मुलगा मनोहर पसार झाले होते. चार दिवसांपूर्वी कपडे घेण्यासाठी मनोहर घरी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्यावर पाळत ठेवून सकाळी दहिसर येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी हितेश मेहताने आमच्या मालाड येथील कार्यालयात पैसे आणून वडिलांना दिले तेव्हा मी तेथे होतो, असे मनोहरने सांगताच पोलिसांनी त्याला बेडय़ा ठोकल्या. मनोहर हा सीएचे शिक्षण घेत आहे. त्याचे मालाडला न्यू लिंक रोडवर कार्यालय आहे. तेथेच मेहताने अरुणाचलमला बॅगा भरून रोकड आणून दिली होती. दरम्यान त्याला व बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू भोन याला न्यायालयाने 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ट्रस्टला दिलेला पैसा नेमका कुठे

मेहताने अरुणाचलमला दिलेल्या 33 कोटींपैकी 15 कोटी मे 2019ला अरुणाचलमच्या ओळखीतल्या मुंबईबाहेरील एका ट्रस्टला देण्यात आले होते. त्यानंतर हैदराबाद येथील अन्य एका ट्रस्टला ऑगस्ट 2019 रोजी 18 कोटी दिले. अरुणाचलमने ट्रस्टच्या नावाखाली घेतलेले 33 कोटी कुठे आहेत, असा प्रश्न आहे.

12 फेब्रुवारीला आरबीआयने बँकेत तपासणी केली, तेव्हा 122 कोटी कमी असल्याचे आढळले. तेव्हा मेहताने अरुणाचलमला पह्न करून पैशांची मागणी केली. तेव्हा तू पुढे होऊन पोलिसांना पैसे आणून देतो असे सांग, म्हणत अरुणाचलमने मेहताला पाठवले आणि तो सटकला.

अन्य आरोपी

बँकेचा माजी उपाध्यक्ष आणि अध्यक्ष हिरेन भानू (57), त्याची पत्नी गौरी भानू (50). गौरीदेखील बँकेची माजी उपाध्यक्ष व अध्यक्ष होती. दोघांनी आधीच दुबईला पळ काढला. याशिवाय सिव्हील कॉन्ट्रक्टर कपिल देढिया याचाही शोध सुरू आहे.