न्यू इंडिया बँक 122 कोटी अपहार प्रकरण-मेहता म्हणतो पैसे दिले, पौन म्हणतो नाही घेतले; रोखीचा व्यवहार आरोपींच्या पथ्यावर

न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींच्या अपहारप्रकरणी आरोपी आणि बँकेचा जनरल मॅनेजर अ‍ॅण्ड हेड अकाऊंट्स हितेश मेहता याच्याकडून 70 कोटी आपल्याला मिळालेच नसल्याचा दावा बिल्डर धर्मेश पौन याने केला आहे. हा गैरव्यवहार रोखीत झाल्याने अपहार झालेल्या पैशाचा माग काढण्याचे मोठे आव्हान तपास अधिकाऱ्यांसमोर आहे.

122 कोटींपैकी 70 कोटी धर्मेश पौनला रोखीने दिल्याचा दावा हितेश मेहता याने केला आहे, पण मेहताकडून पैसे मिळाले नसल्याचे पौन याने तपासात सांगितल्याने पैशांच्या देवाणघेवाणीचे चित्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. आता पोलीस आरोपींची लाय डिटेक्टर चाचणी करण्याचा विचार करत आहेत. तशी परवानगी मिळाल्यास आरोपींची लाय डिटेक्टर चाचणी केली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणातील तिसरा आरोपी अरुणाचलम ऊर्फ अरुणभाई हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

मेहता आणि पौन यांचा दावा परस्परविरोधी असल्याने नेमके पैसे कोणी, पुठे आणि कसे दिले, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. पोलीस पथकाने मंगळवारी पुन्हा प्रभादेवी येथील बँकेच्या मुख्यालयात धडक देऊन तपासणी केली. पोलिसांनी बँकेच्या ऑडिटच्या दस्तावेजांची मागणी केली आहे तसेच काही कागदपत्रे ताब्यात घेतले आहेत.

माजी सीईओंकडे विचारणा

वर्ष 2019 ते 2024 या कालावधीत हा अपहार झाला होता. त्यामुळे या कालावधीत बँकेत वरिष्ठ पातळीवर कार्यरत असलेल्यांची चौकशी होणार आहे. बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू भोमान यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.

इतकी रक्कम बँकेत ठेवण्याची आवश्यकता काय?

बँकेमध्ये 130 हून अधिक कोटींची रोकड का ठेवण्यात आली होती? इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड बँकेत ठेवण्याचा निर्णय कोणाचा होता याचीही पोलीस तपासणी करीत आहेत. पोलिसांची सात पथके गुह्याचा कसून तपास करीत आहेत.

रिझर्व्ह बँकेचे अधिकारी काय करत होते?

वर्ष 2021 पासून रिझर्व्ह बँकेचे अधिकारी न्यू इंडिया सहकारी बँकेच्या कारभारावर पर्यवेक्षण करत होते. असे असेल तर वर्ष 2019 ते 2024 या कालावधीत 122 कोटींचा घोटाळा झालाच कसा? पर्यवेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात कशी आली नाही, असे प्रश्न तपास पथकापुढे उभे ठाकले आहेत.