देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजरी होते. मनमोहन सिंग 2004 ते 2014 पर्यंत दोनदा देशाचे पंतप्रधान होते. मनमोहन सिंग यांना हिंदुस्थानातील आर्थिक उदारीकरण आणि आर्थिक सुधारणांचे जनक देखील म्हटले जाते. पंतप्रधानपद स्वीकारण्यापूर्वी ते अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरही होते. मनमोहन सिंग यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
1991 च्या आर्थिक सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका
मनमोहन यांनी देशातील आर्थिक सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. वर्ष 1991 मध्ये पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असताना, त्यांनी अर्थसंकल्पादरम्यान उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन चालना मिळाली. त्यामुळे व्यापार धोरण, औद्योगिक परवाना, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा आणि देशात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी यासंबंधीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले.
दोनदा देशाचे पंतप्रधान
मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर ते 1991 पासून संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे (राज्यसभा) सदस्य आहेत. राज्यसभेत मनमोहन सिंग हे 1998 ते 2004 दरम्यान विरोधी पक्षनेते होते. मनमोहन सिंग यांनी 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 22 मे रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि 22 मे 2009 रोजी दुसऱ्यांदा पदाची शपथ घेतली. त्यांनी सलग दहा वर्ष देशाचं पंतप्रधानपद भूषवलं.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरसह या पदांवर केलं काम
- डॉ.मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रसंघासोबतही काम केले आहे. 1966-1969 या वर्षात आर्थिक घडामोडींवर संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी त्यांची आर्थिक व्यवहार अधिकारी म्हणून निवड झाली.
- डॉ.मनमोहन सिंग हे 1982 ते 1985 या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरही होते. या काळात त्यांनी अनेक बँकिंग सुधारणा केल्या.
- मनमोहन सिंग यांनी 1985 ते 1987 या काळात नियोजन आयोगाचे प्रमुख म्हणूनही काम केले. त्यांनी 1972 ते 1976 दरम्यान मुख्य आर्थिक सल्लागारासह अनेक पदे भूषवली.
- मनमोहन सिंग 1991 मध्ये आसाममधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर 1995, 2001, 2007 आणि 2013 मध्ये ते राज्यसभेचे सदस्य राहिले. 1998 ते 2004 पर्यंत भाजप सत्तेत असताना ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते. 1999 मध्ये त्यांनी दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढवली पण त्यांना विजय मिळवता आला नाही.