New Delhi Stampede – 26 वर्षात अशी गर्दी पाहिली नव्हती, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर  शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. स्टेशनच्या पादचारी पुलावर मोठी गर्दी जमली होती, प्रचंड रेटारेटीमुळे अनेक प्रवाशी जिन्यावरून थेट फलाटावर कोसळले.  त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.  प्रत्यक्षदर्शींच्या मते, एवढी मोठी गर्दी अपेक्षित नव्हती. सणांच्या काळातही अशी परिस्थिती कधीच पाहिली गेली नाही. स्टेशनवर उपस्थित असलेले प्रशासकीय कर्मचारी आणि एनडीआरएफचे कर्मचारीही परिस्थिती नियंत्रित करू शकले नाहीत.

प्लॅटफॉर्मवर दुकान चालवणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, गेली 26 वर्षे तो इथे काम करतोय. मात्र इतक्या वर्षात एवढी गर्दी कधीच पाहिली नाही. अचानक एवढी गर्दी कशी झाली ते कळले नाही. विशेष म्हणजे दर 20 ते 25 मिनीटांनी विशेष ट्रेन सोडल्या जात होत्या तरीही ट्रेन खचाखच भरुन येत होत्या.

तर अन्य एका प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर उभ्या असलेल्या प्रवाशाने जेव्हा 14 आणि 15 नंबर प्लॅटफॉर्मवर ट्रेन पाहिल्यानंतर लोकं वेगाने त्या दिशेने धावत गेली. जरी गाड्यांचे प्लॅटफॉर्म बदलले गेले नसले तरी गर्दी इतकी मोठी होती की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि गोंधळ निर्माण झाला. गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सतत विशेष गाड्या चालवल्या असल्या तरी, प्रवाशांची संख्या इतकी जास्त होती की हे पाऊल अपुरे ठरले आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीर जखमी झाले.

शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये 9 महिला, 4 पुरुष आणि 5 मुले आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक 9 जण बिहारचे आणि 8 जण दिल्लीचे आहेत. या मृतांच्या कुटुंबियांना सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली आहे.