New Delhi Stampede – मृतांचा आकडा 18 वर, 14 महिलांचा समावेश

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेतील मृतांचा आकडा वाढून 18 झाला आहे. चेंगराचेंगरीमध्ये 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. त्यामुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची रीघ लागली होती. अशातच दोन रेल्वेगाड्या रद्द झाल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर प्रचंड गर्दी उसळली. प्रचंड रेटारेटीमुळे अनेक प्रवाशी जिन्यावरून थेट फलाटावर कोसळले. अनेक प्रवासी रेल्वे रुळावर पडले. यात 18 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 14 महिलांचा समावेश आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर प्लॅटफॉर्म आणि जिन्यावर कपडे, चपला, सामानाचा खच पडल्याचे विदारक दृश्य दिसले.

दरम्यान, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालो आहे, असे म्हणत मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना मोदींनी केली.