ब्रिटनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ, नवीन प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोविड-19 चा धोका पूर्वीसारखा नसेल, पण तो पूर्णपणे संपलेलाही नाही. यातच ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. येथे गेल्या काही आठवड्यात कोविडच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे. ‘द सन’मधील एका वृत्तानुसार, डॉक्टर सुझान विली म्हणाल्या आहेत की, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार सापडला असून सध्या घाबरण्याची गरज नाही, पण सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. त्या म्हणतात की ,कोविडचा नवीन प्रकार वेगाने पसरत आहे, ज्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2025 च्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये फक्त 2.2 टक्के लोक कोविड पॉझिटिव्ह आढळले होते. तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा आकडा 4.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही 7 टक्के वाढ झाली आहे. याबद्दल बोलताना डॉ. विली म्हणाल्या की, कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये विषाणूचे नवीन प्रकार, लोकांची कमी होणारी प्रतिकारशक्ती आणि थंड हवामानामुळे घरात जास्त वेळ घालवणे यांचा समावेश आहे, ज्यामुळे विषाणू जलद पसरू शकतो.