अत्याधुनिक सुविधा नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू, मोखाडा ते नाशिक शंभर किलोमीटरची फरफट

जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयापासून ते नाशिक जिल्हा रुग्णालयापर्यंत या बालकाला तब्बल शंभर किलोमीटरची फरफट करावी लागली. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला, असा आरोप पालकांनी केला आहे.

मोखाडा तालुक्यातील किनिस्ते ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या योगिता पुजारी या महिलेने शुक्रवारी 25 एप्रिल रोजी सकाळी 11 च्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. त्यावेळी त्याचे वजन तीन किलो एवढे होते. पण त्याला संध्याकाळी श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे या नवजात बालकाला तातडीने जव्हार उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणले. या ठिकाणी अतिदक्षता विभागातील एनआयसीयूमध्ये बालकाला ठेवले, पण टुडी ईको व अन्य अत्यावश्यक सुविधा तेथे उपलब्ध नव्हत्या.

अन्य अत्याधुनिक यंत्रणा जव्हार उपजिल्हा रुग्णालयात नव्हती. त्याचा मोठा फटका या बालकाला बसला. पुढील उपचार इथे होणार नाहीत असे डॉक्टरांनी बालकाचे वडील सचिन पुजारी यांना सांगितले. त्यामुळे नाईलाजाने रात्री उशिरा त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात आणले. तिथे केवळ पाचच मिनिटांत बालकाचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आम्हाला धक्का बसला
जव्हार, मोखाडा आणि नाशिक अशा तीन ठिकाणी आमची फरफट झाली. ग्रामीण रुग्णालयात माझ्या पत्नीची सुखरूप प्रसूती झाली. बाळ जन्माला आले तेव्हा त्याची प्रकृती चांगली होती. वजनही योग्य होते. मात्र अचानक आम्हाला नवजात बालकाची तब्येत खराब झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नाशिकमध्ये पाचच मिनिटांत बाळाचा मृत्यू झाल्याने आम्हाला धक्का बसला. या संपूर्ण घटनेची चौकशी करावी व आम्हाला न्याय द्यावा. – सचिन पुजारी (पालक)