
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 500 आणि 10 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती देताना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी नवीन नोटा आल्या तरी जुन्या नोटा वैधच राहतील हे स्पष्ट केले. दोन्ही नवीन नोटांमध्ये काही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. जेणेकरून चलन व्यवस्था आणखी सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. नोटांचा रंग आणि रचनेसह सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पण, नवीन बदलामुळे सध्याच्या नोटांवर काहीही परिणाम होणार नाही.
नवीन 10 आणि 500 रुपयांच्या नोटांवर नवनिर्वाचित गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल. या नोटांची रचना सर्व बाबतीत महात्मा गांधी मालिकेतील 10 आणि 500 रुपयांच्या सध्याच्या नोटांसारखीच असेल. नवीन नोटा आल्या तरी आरबीआयने यापूर्वी जारी केलेल्या 10 आणि 500 रुपयांच्या सर्व नोटा वैध चलन म्हणून कायम राहतील, असे आरबीआयने स्पष्ट केले.
लवकरच 100 आणि 200 च्याही नोटा
मागील महिन्यात आरबीआयने 100 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्याची घोषणा केली होती. नवीन नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल. डिसेंबर 2024 पासून मल्होत्रा या पदावर कार्यरत आहेत.