नेस्को प्रदर्शन केंद्रातील श्वानांची उपासमार

ना आम्ही खाऊपिऊ घालणार ना तुम्हाला तसे करायला देणार, असा आडमुठेपणा नेस्को प्रदर्शन केंद्रातल्या मॅनेजमेंटमधील एक महिला व सुरक्षा रक्षकाने घेतल्याने त्याचा तेथील मुक्या जिवांना मोठा फटका बसत आहे. श्वानांना अन्न देण्यास त्या दोघांनी श्वानप्रेमींना मज्जाव केला असून त्यांना केंद्रात पाऊल ठेवण्यास देखील बंदी केली आहे. परिणामी तेथील श्वानांची प्रचंड उपासमार होत आहे. अन्न व वैद्यकीय उपचार न मिळाल्याने गेल्या आठवडाभरात सात श्वानांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेस्को प्रदर्शन केंद्रात मोठय़ा संख्येने श्वान आहेत. काही श्वानप्रेमी त्या मुक्या जिवांना दोन वेळेला खाऊपिऊ घालतात. इतकेच नाही तर त्यांच्या तब्येतीची काळजी घेतात. श्वान आजारी पडले की त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करतात. मात्र केंद्रातील महिला मिनी आणि सुरक्षा रक्षक शौर्या यांनी चार महिन्यांपासून श्वानप्रेमींना प्रदर्शन केंद्रात पाऊल ठेवण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे याचा जबर फटका केंद्रातील 30 ते 40 श्वानांना बसत आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरात सात श्वान दगावले, अशी तक्रार श्वानप्रेमींनी केल्यानंतर मिनी व शौर्या या दोघींविरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.