नेरुरकर चषक खो खो स्पर्धा – कोल्हापूर, पुणे, सांगलीचे दोन गटांत वर्चस्वच; धाराशीव, उपनगरही अंतिम फेरीत

खो-खोतील अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा भाई नेरुरकर चषक स्पर्धेत कोल्हापूर, पुणे आणि सांगलीने आपले वर्चस्व दाखवताना दोन-दोन गटांच्या अंतिम फेरीत धडक मारली. तसेच धाराशीवच्या महिला संघाने आणि मुंबई उपनगरच्या पुरुष संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

उपांत्य फेरीत झालेल्या चुरशीच्या लढतींमध्ये खेळाडूंच्या अप्रतिम कौशल्याचे दर्शन घडले.

पुरुष गटः मुंबई उपनगरने पुरुष गटात सांगलीचा 17-16 असा निसटता विजय मिळवला. अक्षय भांगरे (1.30, 1.50 मि. संरक्षण, 1 गुण), दीपक माधव (1.40 मि., 4 गुण) आणि अनिकेत पोटे (1.20 मि., 4 गुण) यांनी संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. दुसऱया सामन्यात कोल्हापूरने पुण्याला 22-18 असे पराभूत केले. महिला गटातील उपांत्य सामन्यात मध्यंतरापर्यंत 7-7 असे बरोबरीत रोखलेल्या धाराशीवने कोल्हापूरला 12-10 असे 2 गुण आणि 3.10 मिनिटे राखून नमविले. दुसऱया उपांत्य सामन्यात मध्यंतराच्या 6-8 अशा पिछाडीवरून पुण्याने ठाण्यावर 16-12 असा 4 गुणांनी विजय मिळविला. पुण्याच्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेतील हिंदुस्थानी संघाची कर्णधार प्रियंका इंगळेने (2.10, 2.30 मिनिटे संरक्षण व 4 गुण) अष्टपैलू कामगिरी केली. तिला दीपाली राठोड (2.20 मिनिटे व 4 गुण) व भाग्यश्री बडे (1.10, 1.40 मिनिटे व एक गुण) यांनी साथ दिली.

किशोर गटात कोल्हापूरने धाराशीवचा 15-14 असा रोमांचक पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता त्यांची गाठ सांगलीशी पडेल. सांगलीने साताऱयाचा 20-16 असा पराभव केला. किशोरी गटाच्या उपांत्य सामन्यात सांगलीने ठाण्याला 14-8 अशा 6 गुणांनी सहज हरवले, तर पुण्याने धाराशीवचा 12-10 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.

अंतिम फेरीची होणाऱया रंगतदार लढती

पुरुष गट  कोल्हापूर वि. मुंबई उपनगर

महिला गट  धाराशीव वि. पुणे

किशोर गट  कोल्हापूर वि. सांगली

किशोरी गट  सांगली वि. पुणे