Nepal Plane Crash : नेपाळमध्ये मोठी विमान दुर्घटना, टेक ऑफ करताना प्रवासी विमान कोसळलं

नेपाळमध्ये मोठी विमान दुर्घटना झाली आहे. राजधानी काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेक ऑफ करताना विमान कोसळले आणि विमानाला आग लागली. ही दुर्घटना घडली तेव्हा विमानात पायलटसह 19 लोकं होते. हे विमान काठमांडूहून पोखरे येथे चालले होते.

प्राथमिक माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमान सौर्या एअरलाईन्सचे होते. सकाळी 11च्या सुमारास टेक ऑफ दरम्यान धावपट्टीवरून घसरले आणि विमानाला आग लागली. याची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच नेपाळ सरकारने सैन्याचीही मदत घेतली असून सध्या बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

अग्निशमन दलाकडून विमानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. या विमान दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात विमान आगीच्या ज्वाळांनी घेरल्याचे दिसते. सध्या आग विझवण्याचे काम सुरू असून त्यानंतरच विमानातील प्रवाशांची स्थिती स्पष्ट होईल.

दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून विमानाच्या सांगाड्यातून आतापर्यंत 15 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर चौघे जखमी आहेत. त्यांना उपाचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

68 जणांचा मृत्यू

दरम्यान, नेपाळमधील आकाश विमानांसाठी काळ बनले आहे. येथे सातत्याने विमान अपघात होत असतात. गेल्यावर्षी 14 जानेवारीला नेपाळची राजधानी काठमांडूपासून 205 किमी दूर पोखरामध्ये येती एअरलाईन्सचे विमान कोसळले होते. एटीआर-72 हे विमान कोसळून 68 जणांचा मृत्यू झाला होता. लँडिंग करण्याच्या आधी एका टेकडीवर आदळून ही विमान दुर्घटना झाली होती.