ना आमदार…ना पुरेशी मते; मनसेची मान्यता रद्द होणार, इंजिनही जाणार

विधानसभा निवडणुकीत एकही आमदार निवडून आणता न आल्याने मनसे संकटात सापडली आहे. मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. मान्यता कायम राखण्यासाठी असलेले निकष मनसे पूर्ण करताना दिसत नसल्याने निवडणूक आयोग लवकरच अशा पक्षांना कारणे दाखवा नोटीस पाठवेल, अशी माहिती विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली.

निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानापैकी 8 टक्के मतं आणि 1 जागा किंवा 6 टक्के मते आणि 2 जागा किंवा 3 टक्के मतदान आणि 3 जागा असे मान्यतेचे निकष आहेत. यातील एकही निकष मनसेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण केलेले नाही. राज्यात जवळपास 6 कोटी मतदारांनी यंदा मतदान केले. त्यातील आठ टक्के मते मनसेने मिळवणे गरजेचे होते. म्हणजेच सुमारे 48 लाख मते मनसेला मिळायला हवी होती. परंतु ती न मिळाल्याने आता मनसेची इंजिन निशाणीही काढून घेतली जाऊ शकते. त्यानंतर त्यांना उरल्यासुरल्या चिन्हांपैकी एखादे चिन्ह निवडणूक आयोग देईल, असे कळसे यांनी सांगितले. यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये प्रत्येकी एक आमदार निवडून आल्याने मनसेला मान्यता टिकवता आली होती.