उद्धव ठाकरे यांच्यासोबतच नाही, तर महाराष्ट्रासोबत विश्वासघात झाला आहे; आदित्य ठाकरे कडाडले

लोकसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी उरणमध्ये सभा घेतली. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी विधानसभा जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी आतापासून कामाला लागावे आणि परिवर्तन घडवावे, असे आवाहन केले. तसेच घटनाबाह्य आणि महाराष्ट्रद्वेष्ट्ये सरकार हटवून आपल्याला आपले महाराष्ट्राचे हित करणारे सरकार आणायचे आहे, त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले.

राज्यात झालेली गद्दारी कोणालाही पटलेली नाही. धर्माचार्य शंकराचार्य यांनीही याबाबतचे मत व्यक्त केले आहे. विश्वासघात हे सर्वात मोठे पाप आहे, असे त्यांनी सांगितले. विश्वासघात हा फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबतच नाही, तर महाराष्ट्रासोबत विश्वासघात झाला आहे. राज्यातून अनेक प्रकल्प गुजरातला गेले. वर्ल्ड कपची फायनलही गुजरातला गेली. त्यानंतर राज्यात एकही प्रकल्प आला नाही.

इतर राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात आणि मुंबईत येतात. येथील गुंतवणूक त्यांच्या राज्यात नेतात. मात्र, राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीवारी करत आहेत. आता येणाऱ्या अर्थसंकल्पात बिहारसह इतर राज्यांना विशेष पॅकेज देण्यात येतील. मात्र, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी राज्याला पॅकेज द्यावे, अशी मागणी केलेली नाही. तसेच आपला थकलेले जीएसटीही त्यांनी दिलेली नाही.

राज्यातील परिस्थिती याआधी कधीही नव्हती, एवढी बिकट झाली आहे. आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे. महाराष्ट्रद्वेष्ट्ये भाजप राज्यात बदल करू शकत नाही. तसेच स्वतःच्या स्वार्थासाठी गुजरात, सुरत, गुवाहाटी, गोवा येथे पळून नाचत होते. ते राज्याचे हित करू शकत नाही. तसेच बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींचा सत्कार करणारे महिलांना सन्मान करू शकणार आहे का, असा सवालही त्यांनी केला.

आता अनेकांना धमकावण्यात येईल, अनेकांना आमिषे दाखवण्यात येतील. त्याला बळी पडू नये. राज्याला हवा असलेला बदल भाजप किंवा मिंधे करू शकत नाही. हा बदल घडवण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यायचा आहे. माझ्यासमोर असलेला जनताजनार्दनच हा बदल घडवू शकतो. आपल्याला घटनाबाह्य आणि महाराष्ट्रद्वेष्ट्ये सरकार हटवून आपल्याला आपले सरकार आणायचे आहे. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले. महाराष्ट्रासाठी ही लढाई लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आतापासूनच तयारी करा, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.