आलीस तशीच परत जा! मेलबर्न कॉन्सर्टमध्ये नेहा कक्करला तीन तास उशीर, चाहते भडकले

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर तिच्या गोड आवाजामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. पण सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिच्या आवाजावर फिदा असणाऱ्या चाहत्यांनीच तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. चाहत्यांच्या नाराजीमुळे नेहाला अश्रू अनावर झाले आहेत. यासंदर्भातील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये नेहा कक्करच्या गाण्याचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. यासाठी हजारोंच्या सख्येने चाहत्यांनी हजेरी लावली होती. पण नेहा या कॉन्सर्टला एक दोन नाही तब्बल तीन तास उशिराने पोहोचली. त्यामुळे तिचे चाहते नाराज झाले. दरम्यान 3 तासांनी जेव्हा नेहा स्टेजवर आली तेव्हा काहींना आनंद झाला, तर काहींनी तिला परत घरी जा असे सांगितले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कॉन्सर्टच्या स्टेजवर पोहोचताच नेहा कक्करने सगळ्यांची माफी मागितली. मित्रांनो, तुम्ही खरच खूप चांगले आहात. तुम्ही सगळ्यांनी संयम ठेवला. गेल्या तीन तासांपासून तुम्ही इथे माझी वाट पाहत आहात. मला माझीच चीड येतेय. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी याआधी कोणालाच अशी वाट बघायला नाही लावली. तुम्ही वेळात वेळ काढून फक्त माझ्यासाठी येथे आला आहात. हे मी कधीच विसरणार नाही, असे म्हणत नेहाला अश्रू अनावर झाले.

व्हायरल व्हिडीओमध्ये चाहते भडकलेले दिसत आहेत. ‘परत जा, आपल्या हॉटेलमध्ये जाऊन आराम कर! हे इंडिया नाही, हे ऑस्ट्रेलिया आहे! असे काही चाहते म्हणाले. तर काहींनी खूप छान अॅक्टिंग केलीस, आता परत जा. हे तुझं इंडियन आयडल नाहीए. तू इथे लहान मुलांसमोर परफॉर्म करायला नाही आलीए,असे म्हणत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.