राज्यभरात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्याचे म्हणता, कुठे आहेत या नोंदी? एकाही ग्रामपंचायतीने किती नेंदी मिळाल्या याची माहिती फलकावर लावलेली नाही. जमत नसेल तर सरळ उठून जा… मनोज जरांगे पाटील यांनी भरबैठकीत सरकारच्या नाकर्तेपणाचा पंचनामा करताच मध्यस्थीसाठी आलेले आमदार बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी आंतरवालीतून काढता पाय घेतला. मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करण्याचा मुहूर्त आता 48 तासांवर येऊन ठेपला आहे. मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी सरकारने हरतऱहेचे प्रयत्न सुरू केले आहेत.
आमदार बच्चू कडू यांनी बैठकीतूनच विभागीय आयुक्तांना फोन लावून सापडलेल्या कुणबी नेंदीच्या याद्या लागल्या नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पत्रके काढता आणि आम्हाला तोंडावर पाडता, असे म्हणत त्यांनी आयुक्तांना झापले. z 20 तारखेच्या आत 54 लाख प्रमाणपत्र वाटा. किती प्रमाणपत्र वाटले याची माहिती द्या. नसता आमचे तर ठरलेले आहेच असे मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला ठणकावून सांगितले.