NEET परीक्षेचा पेपर लीक झालेला नाही! महासंचालक सुबोध कुमार यांनी आरोप फेटाळले

MBBS Exam

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) च्या अनेक परीक्षार्थिंनी अनियमितता आणि गुणांच्या खैरातीमुळे 67 उमेदवार परीक्षेत प्रथम क्रमांकावर आल्याचा आरोप केले आहेत, त्याचे महासंचालक सुबोध कुमार यांनी खंडन केले आहे. शनिवारी बोलताना कोणताही पेपर फुटला नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना, एनटीए अध्यक्षांनी असंही सांगितलं की एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी गोष्टींचं विश्लेषण केलं आणि निष्कर्ष काढला की ही समस्या फक्त सहा परीक्षा केंद्रांपुरती मर्यादित आहे.

कुमार म्हणाले की NEET उमेदवारांच्या निकालात ग्रेस गुण मिळू शकतात आणि शिक्षण मंत्रालयानं 1,500 हून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल पुन्हा तपासण्यासाठी एक पॅनेल स्थापन केलं आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कुमार म्हणाले, आम्ही सर्व गोष्टींचं पारदर्शकपणे विश्लेषण केलं आणि निकाल जाहीर केले.

‘4,750 परीक्षा केंद्रांपैकी, ही समस्या सहा केंद्रांपुरती मर्यादित होती आणि 24 लाख उमेदवारांपैकी केवळ 1,600 उमेदवारांना याचा फटका बसला. देशभरातील या परीक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड झालेली नाही’, असे ते पुढे म्हणाले.

कुमार म्हणाले, ‘आम्ही आमच्या पद्धतीचे विश्लेषण केले आणि पेपर लीक झालेला नाही.’

‘उमेदवारांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. ही जगातील किंवा देशातील सर्वात मोठी स्पर्धात्मक परीक्षा आहे जी एका शिफ्टमध्ये सुमारे 24 लाख उमेदवार आणि 4,750 केंद्रांसह होते. या परीक्षेचे प्रमाण सर्वात मोठे आहे. काही समस्या होत्या. सुमारे सहा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांच्या चुकीच्या वितरणामुळे सुमारे 1,600 उमेदवारांना फटका बसला’, असं कुमार यांनी सांगितलं.

‘उमेदवारांनी आरोप केला की त्यांना कमी वेळ मिळाला आहे. आम्ही उच्च न्यायालयात उत्तर दिलं आहे की आम्ही तज्ञांची तक्रार निवारण समिती स्थापन केली आहे, जी केंद्रातील अहवाल, सीसीटीव्ही फुटेजसह गमावलेल्या वेळेचा तपशील पाहतील’, असं ते पुढे म्हणाले.