नीरजचे सुवर्ण एका सेंटीमीटरने हुकले! डायमंड लीग फायनलमध्ये उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

जे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडले त्याचीच पुनरावृत्ती डायमंड लीगमध्येही झाली. हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला ब्रुसेल्स डायमंड लीग फायनलमध्ये अवघ्या एक सेंटीमीटर फरकाने जेतेपदाने हुलकावणी दिली आणि त्याचे सुवर्ण स्वप्न डायमंड लीगमध्येही भंगले. 87.86 मीटर भालाफेक करून नीरज दुसऱ्या स्थानी राहिला, तर ग्रेनेडाच्या अ‍ॅण्डरसन पीटर्सने 87.87 मीटर भाला फेकत विजेतेपदावर आपले नाव कोरले. जर्मनीचा ज्युलियन वेबर (85.97 मीटर) तिसऱ्या स्थानावर राहिला.

अ‍ॅण्डरसन पीटर्सने पहिल्याच प्रयत्नात 87.87 मीटर भालाफेक केली. नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात 86.82 मीटर भालाफेक दुसरा क्रमांक पटकावला. दुसऱ्या प्रयत्नात त्याचा भाला केवळ 83.49 मीटर इतकाच लांब गेला. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात नीरजने 87.86 मीटर भालाफेक करीत जेतेपदाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. कारण त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 89.45 मीटर भालाफेक करीत रौप्यपदक पटकावले होते.

पॅरिस ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकविजेता अर्शद नदीम डायमंड लीगमध्ये सहभागी झाला नव्हता. त्यामुळे पीटर्सची 87.87 मीटरची कामगिरी नीरजच्या अगदीच टप्प्यात होती. मात्र, हिंदुस्थानी खेळाडूला उर्वरित तीन प्रयत्नात पीटर्सनचा करेक्ट कार्यक्रम करता न आल्याने अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

अ‍ॅण्डरसनचे डायमंड लीगचे पहिले जेतेपद

अ‍ॅण्डरसन पीटर्सने कारकिर्दीत प्रथमच डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले. गेल्या महिन्यात पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याने कांस्यपदक जिंकले होते. पीटर्सने दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपचा किताबही जिंकलेला आहे. 2019 आणि 2022 मध्ये त्याने ही कामगिरी केली. याशिवाय पीटर्सने राष्ट्रकुल स्पर्धेत एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. 93.07 मीटर हा पीटर्सच्या कारकिर्दीतील सर्वेत्तम थ्रो होय.

नीरज चोप्राची कामगिरी

2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक
2022च्या डायमंड लीगमध्ये विजेतेपद
2022च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक
2023च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक
2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक
आशियाई स्पर्धेत 2, तर राष्ट्रकुल स्पर्धेत एक सुवर्णपदक

नीरज चोप्राचे 15 लाखांचे नुकसान

नीरज चोप्रा ब्रुसेल्स डायमंड लीग फायनल्समध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याला 12 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 10 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. विजेतेपद पटकावणाऱ्या पीटर्सनला 30 हजार डॉलर्स म्हणजे सुमारे 25.16 लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. म्हणजेच केवळ एक सेंटीमीटर फरकाने मागे राहिल्याने नीरज चोप्राचे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले.

हाताला फ्रॅक्चर तरी नीरज लढला

नीरज चोप्राला 9 सप्टेंबरला सरावादरम्यान दुखापत झाली होती. एक्स-रेमध्ये त्याच्या डाव्या हाताचे चौथे मेटाकार्पल हाड फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नीरजने ब्रुसेल्स डायमंड लीग फायनल्समध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. या दुखापतीनंतरही त्याने उपविजेतेपद पटकावले हे विशेष!