Paris Olympic 2024 : नीरजचे विक्रमी रौप्य, सलग ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा केला पराक्रम

हिंदुस्थानच्या कांस्य चौकारानंतर भालाफेकपटू नीरज चोप्राने आपली मोसमातील सर्वेत्तम 89.45 मीटर लांब फेक करत रौप्य जिंकण्याचा पराक्रम केला. हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक इतिहासात अॅथलेटिक्समध्ये सलग ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिक विक्रमासह 92.97 मीटर भालाफेक करत सोनेरी यश संपादले.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडवणाऱया नीरजच्या भाल्याला आज सोनेरी पराक्रमाची किमया साधण्यात अपयश आले. मात्र त्याने तिरंगा फडकावताना रुपेरी यश मिळवत हिंदुस्थानला पाचवे पदक जिंकून दिले. गेल्या 13 दिवसांत हिंदुस्थानला चारही कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते तर आज त्याने रौप्य पदक जिंकून कांस्यपदकाची मालिका खंडित केली. हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक इतिहासात सलग ऑलिम्पिकमध्ये पदके सुशील कुमार आणि पीव्ही सिंधूला यांनाच जिंकता आली होती. तर या ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने दोन पदके जिंकण्याचा पराक्रम केला होता. आज त्या पंक्तित नीरजच्या नावाचाही समावेश झाला.

देशासाठी आपण जेव्हा पदक जिंकतो तेव्हा आनंद होतोच. रौप्य पदक जिंकलो त्याचे समाधान आहेच, पण सुवर्ण पदक हुकल्याचे दुःखही कुठे तरी मनात आहे. आता स्वतःमध्ये आणखी सुधारणा करण्याची वेळ आली आहे. याबाबत टीमबरोबर बसून चर्चा करेन. – नीरज चोप्रा

हिंदुस्थानचा पदकांचा षटकार, अमनने कांस्य जिंकले

हिंदुस्थानचा 21 वर्षीय कुस्तीपटू अमन सेहरावतने पोर्तो रिकोच्या डॅरिएन तोई क्रूझचे आव्हान सहज परतवत कांस्य पदकावर मोहोर उमटवली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील हिंदुस्थानचे कुस्तीतील हे पहिलेच पदक ठरले असून हिंदुस्थानने पदकांचा षटकार ठोकला आहे. ‘मी हे पदक माझ्या दिवंगत आई-वडिलांना आणि देशाला अर्पण करतो’, असे अमन म्हणाला.