आता जागतिक अजिंक्यपदाचे लक्ष्य

हे पूर्ण वर्ष माझ्यासाठी दुखापतींनी भरलेलं होतं. ऑलिम्पिकपाठोपाठ डायमंड लीगमध्येही दुखापतीचा माझ्या कामगिरीवर परिणाम झाला, मात्र मी आता या दुखापतीतून सावरलोय. नव्या हंगामासाठी मी पूर्णपणे तंदुरुस्त असेन. त्यामुळे पुढील वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा हेच मुख्य लक्ष्य असेल आणि यासाठी मी आतापासूनच तयारीला लागलोय, अशी माहिती हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दिली.

हरयाणा स्पोर्टस् युनिव्हर्सिटीने ‘मिशन ऑलिम्पिक 2036’ संदर्भात आयोजित केलेल्या परिषदेत नीरज भरभरून बोलत होता. तो म्हणाला, 2025 टोकियो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पोडियम फिनिश करणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. पुढील वर्षी 13 ते 21 सप्टेंबरदरम्यान जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. यासाठी मी आतापासूनच तयारी सुरू करतोय. ऑलिम्पिक नेहमीच आपल्या मनात असते, पण त्यासाठी आपल्याकडे चार वर्षे असतात, असेही तो म्हणाला.

दुखापतीतून सावरण्यासाठी शस्त्रक्रिया करायची की नाही, हे ठरवण्यासाठी मी डॉक्टरांशी सल्लामसलत करणार आहे. पण सध्या मी दुखापतीतून सावरलो असून, आता केवळ तंत्र सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलेय. मला हिंदुस्थानात सराव करायला आवडते. पण स्पर्धा सुरू झाल्या की परदेशात सराव करणे माझ्यासाठी चांगले असते. आम्ही आगामी काळात ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक या दोन्ही स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करू, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.