लग्नाआधीच आई झाली, काकीनं निम्म्या रात्री घराबाहेर काढलं; अभिनेत्रीवर आलेली वाईट वेळ

लग्नाआधीच आई झाली… चिमुरडीला घेऊन काकीच्या घरी राहिली, पण निम्म्या रात्री काकीने घराबाहेर काढले…खिशात पैसेही नव्हते… शेवटी काकांना दया आली आणि त्यांनी दुसऱ्या एका फ्लॅटमध्ये राहण्याची व्यवस्था केली. हा सर्व प्रसंग घडला 80 च्या दशकामध्ये बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री निना गुप्ता यांच्यासोबत. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वत:च हा खुलासा केला आहे.

निना गुप्ता या 80 च्या दशकामध्ये दिल्लीहून मुंबईत आल्या आणि काही काळ शेअर अपार्टमेंटमध्ये राहिल्या. त्यानंतर आई-वडिलांच्या मदतीने त्यांनी एक फ्लॅट घेतला. पुढे मी कधीच भाड्याच्या घरात राहिले नाही आणि एक विकून दुसरा फ्लॅट खरेदी करत राहिले, असे निना गुप्ता यांनी सांगितले. जसे जसे पैसे कमावू लागले तसे तसे जुना फ्लॅट विकून नवीन घेत राहिले. पण एकदा नवीन फ्लॅट घेण्याचा विचार सुरू असताना काही काळ मी काकींच्या घरी रहायला गेले, मात्र निम्म्या रात्री त्यांनी मला घराबाहेर काढले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.

एका नवीन अपार्टमेंटमध्ये मी 3 बीएचके फ्लॅट बूक केला होता. आधीचे घर विकून नवीन घरासाठी पैसे लावले होते. त्यामुळे शिल्लकही जास्त नव्हते. म्हणून मला काका-काकींकडे राहण्याचा निर्णय घ्यावा लागला. मी त्यांच्या घरी आधीही राहिले होते. बराच काळ मी चित्रिकरणात व्यस्त असायच्या, फक्त झोपायला घरी जायचे. मसाबाही तेव्हा छोटी होती आणि काकीही तिची काळजी घ्यायची. पण एक दिवस निम्म्या रात्री काकीने मला घराबाहेर काढले आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी बदलत गेल्या, असे निना गुप्ता यांनी सांगितले.

माझ्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे मी बेघर झाले होते. निम्म्या रात्री मी कुठे जाणार होती. अशा वेळी काकांनाच दया आली आणि त्यांनी जुहू येथील एका मोकळ्या फ्लॅटमध्ये राहण्याची मला परवानगी दिली. ते घर 20 वर्षापासून बंद होते. घरात जाळे जळमाटे होते. मी तिथे छोट्या मुलीला घेऊन गेले आणि घराची साफसफाई केली. पण नंतर लवकरच मला ते घरही सोडण्यास सांगितले. खिशात पैसा नसल्याने मी घर घेण्यासाठी ज्या बिल्डरला पैसे दिले होते त्याची भेट घेतली आणि त्याला सर्व परिस्थिती सांगितली. त्याने आढेवेढे न घेता माझे पैसे मला परत दिले आणि त्या पैशातून मी आराम नगर भागात घर घेतले, असे निना गुप्ता यांनी सांगितले.