![ambadas danve bmc](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/ambadas-danve-bmc-696x447.jpg)
मुंबई महापालिका कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेणार असून शहरी आणि ग्रामीण भागातील हजारो उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. मात्र ही परीक्षा राबवण्याचे काम तलाठी व इतर पेपरफुटी झालेल्या एजन्सीला देण्यात आलेले आहे. त्यामुळे या परीक्षा खासगी केंद्रांवर न घेता पेपरफुटी टाळण्यासाठी त्या ‘टीसीएस’च्या अधिकृत केंद्रांवर पारदर्शीपणे घेण्यात याव्यात, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
मुंबई महानगरपालिका कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता या पदांसाठी 9 फेब्रुवारीला ऑनलाईन परीक्षा घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी आज पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. राज्य सरकारकडून खासगी केंद्रांवर घेण्यात आलेल्या तलाठी व अन्य पदाच्या परीक्षेवेळी पेपरफुटी झाल्यामुळे या परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली होती. त्यामुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि पेपरफुटी टाळण्यासाठी टीसीएस परीक्षा केंद्रावर त्या घेण्यात याव्यात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तसेच राज्यातील इतर भागातून परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी खासगी केंद्रावर परीक्षा झाल्यास या परीक्षेमध्ये अनियमितता होण्याची शंका निवेदनाद्वारे माझ्याकडे व्यक्त केल्या आहेत. यावेळी इंजिनीअरिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश देशमुख, युवा सेना सहसचिव धर्मराज दानवे उपस्थित होते.
पालिका शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरा!
दादर पश्चिमच्या भवानी शंकर रोड येथील मुंबई महापालिकेची सीबीएसई शाळा आणि मुंबई पब्लिक स्कूलमधील शिक्षकांची रिक्त पदे आवश्यकतेनुसार तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली.
साईबाबा पालिका शाळेची उभारणी जलदगतीने करा!
लालबाग येथील साईबाबा पालिका शाळेचा पुनर्विकास करण्यात येत आहे. ही शाळा तोडण्यात आली असून या शाळा उभारणीचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
…तर उमेदवारांवर अन्याय होईल!
देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून नाव असलेल्या मुंबई महापालिकेमध्ये नोकरीची संधी मिळणे हे अनेक मुला-मुलींचे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील उमेदवारांनी अभ्यास केंद्रांमध्ये जाऊन पूर्वतयारी केली आहे. त्यामुळे खासगी परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेताना अनियमितता झाल्यास प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होईल, असे दानवे म्हणाले.