पाटणमध्ये एनडीआरएफची टीम दाखल

पाटण तालुक्यात एनडीआरएफ टीम दाखल झाली आहे. अतिवृष्टी, भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांना या एनडीआरएफ टीमने भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर संबंधित गावातील ग्रामस्थांशी चर्चा करून संभाव्य घटनांबाबत माहिती देऊन जनजागृती केली.

अतिपर्जन्यवृष्टीचा भाग म्हणून पाटण तालुक्याची ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी पाटण तालुक्यातील मोरगिरी, कोयनानगरसह इतर विभागांमध्ये ढगफुटी झाली होती. आंबेघर, मिरगाव, ढोकावळे आदी गावामध्ये भूस्खलनामुळे दरडी कोसळून अख्खी घरे मातीत गाडली गेली होती. तब्बल 29 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. जनावरेही मातीत गाडली गेली होती. यावेळी घटनास्थळी पोहोचताना रस्ता उपलब्ध न झाल्याने पाटणच्या प्रशासकीय यंत्रणेबरोबरच एनडीआरएफ टीमला मोठी कसरत करावी लागली होती. त्यावेळी एनडीआरएफ टीमने चांगले योगदान दिले होते.

याच पार्श्वभूमीवर संभाव्य धोका लक्षात घेता पाटणचे प्रशासन पहिल्यापासूनच अर्लट मोडवर आले आहे. संबंधित दरडग्रस्त व पूरग्रस्त गाकांच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्तेही मोकळे करण्यात आले आहेत. एनडीआरएफ टीम दाखल झाल्यानंतर तहसीलदार अनंत गुरव यांनी संबंधित टीमसोबत बैठक घेऊन त्यांना धोकादायक दरडग्रस्त व पूरग्रस्त गाकांची माहिती दिली.