राजस्थानमधील दौसा येथे दोन वर्षाची चिमुरडी 35 फूट बोअरवेलमध्ये पडल्याची घटना बुधवारी घडली. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दला(SDRF)ने घटनास्थळी धाव घेत चिमुकलीच्या बचावासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर तब्बल 18 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गुरुवारी चिमुकलीची यशस्वी सुटका करण्यात आली.
बोअरवेलमधून सुटका केल्यानंतर मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीममुळे मुलीचे बचावकार्य यशस्वी झाल्याचे एसपी रंजिता शर्मा यांनी सांगितले.
एनडीआरएफचे योगेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी 28 फुटांवर अडकली होती आणि तिला वाचवण्यासाठी समांतर मार्ग खोदण्यात आला होता. सुरक्षेमुळे बचावकार्यास अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला. एकूण 30 जणांचा या बचावकार्यात सहभाग होता. अखेर बचाव पथकांनी 18 तास परिश्रण घेत मुलीची सुखरुप सुटका केली.