![cricket league](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/cricket-league-696x447.jpg)
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एनडीसीए प्रोफेशनल लीग-3 ला रविवारी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी प्रो जम्बो, पंचवटी वॉरिअर्सने सामने जिंकले. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सन 2024-25 च्या एनडीसीए प्रोफेशनल लीगचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या हस्ते सर्व संघांचे मालक, चषक प्रायोजक वर्षा थोरात व सुनील पटेल यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे, खजिनदार हेमंत देशपांडे, अनिरुद्ध भांडारकर, रतन कुयटे, सर्वेश देशमुख व खेळाडू उपस्थित होते. या लीगमध्ये डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यावसायिक आदींचे सात संघ सहभागी आहेत.
पहिल्या सामन्यात जे. सी. रायडर्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 बाद 143 धावा केल्या. त्यात गणेश चौधरीने सर्वाधिक 46 धावांचे योगदान दिले. उत्तरादाखल पंचवटी वॉरीअर्सच्या सलामीवीर स्वप्नील राजपूतने केवळ 41 चेंडूत 12 चौकार व 4 षटकारांसह 86 धावा फटकावल्या. यामुळे संघाने 12.4 षटकातच दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात मराठा वॉरीअर्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात पाच बाद 196 धावांचे आव्हान प्रो जम्बोसमोर ठेवले, त्यांनी 19.1 षटकात 9 बाद 199 धावा करत हा सामना जिंकला.