![supriya sule on evm](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/12/supriya-sule-on-evm-696x447.jpg)
देशमुख कुटुंबियांना आणि बीडकरांना न्याय मिळायला हवा, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पावर पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. याप्रकरणी तपास कसा सुरू आहे, याची माहिती जाणून घेण्यासाठी त्या स्वतः 18 फेब्रुवारीला बीडला जाणार असून प्रशासनाची भेट घेणार असल्याची माहिती सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिली.
भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यावर आपली प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ”नक्की महाराष्ट्रात काय चाललंय? हे कळत नाही. यामुळेच मी स्वतःच ठरवलं आहे की, दोन महिने झाले अनेक लोक यांच्यासाठी (संतोष देशमुख) लढत होते. बजरंग सोनावणे यांनी दिल्लीत निर्मला सीतारमण आणि अमित शहा यांची भेट घेतली. भ्रष्टाचार, खंडणी, घरगुती हिंसाचार आणि हत्या, असे अनेक प्रकरणे आणि आरोप झाले आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यात दुर्दैवाने या महाराष्ट्राच्या सरकारने ठोस असली कोणतीही भूमिका घेतली नाही, किंवा कुठलीही चौकशी सुरू आहे, याची माहिती कोणालाच दिली नाही. पाचवा खुनी आज 60 दिवसानंतरही फरार आहे. हे खूप दुर्दैवी असून अस्वस्थ करणारं आहे. महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ आहे. असा प्रश्न मनात येतो की, माणुसकी काही राहिली आहे की नाही.”
धस यांच्याबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या की, ”मी बजरंग सोनावणे आणि संदीप क्षरसागर यांना संपर्क केला आहे. यातून राजकरण आणि तडजोड जी होत आहे, हे खूप धक्कादायक आहे. माझा अजूनही विश्वास आहे की, सुरेश धस तडजोड करणार नाही. माझ्या स्वतःच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. पोटतिडकीने आपल्या मातीसाठी आणि बीडसाठी ते न्याय मागत होते. त्यात ते सातत्य ठेवतील, इतकी माझी अपेक्षा आहे. त्या कुटुंबाला आणि बीडकरांना न्याय मिळायला हवा.”
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, ”गेल्या 60 दिवसानंतर मला जी परिस्थिती पाहायला मिळत आहे, ही चिंताजनक आहे. कुठल्याही सरकारने कोणावरही दबाव टाकून सत्य लपू नये, इतकीच माझी या सरकारला विनंती आहे. मी स्वतः 18 फेब्रुवारीला बीडला जाणार आणि प्रशासनाची भेट घेणार आहे.”