केंद्र सरकार निगरगट्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी असंवेदनशील; मणिपूरवरून आव्हाडांची टीका

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले असून मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असंवेदनशील आहेत आणि केंद्र सरकार निगरगट्ट झाले आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

एक्सवर पोस्ट करून आव्हाड म्हणाले की, मणिपूर पेटले! वर्तमानपत्रातील या हेडलाईन्ससुद्धा आता सामान्य झाल्या आहेत, इतकं केंद्र सरकार निगरगट्ट आहे. मणिपूरमधील परिस्थिती चिघळून आता जवळपास १६ महिने होतील. तेथील हिंसाचारात आजवर असंख्य बळी गेले आहेत आणि मुली, बहिणी, माता लैंगिक अत्याचाराला बळी पडतायत, इंटरनेट सेवा बंद आहेत, शेकडोंनी नागरिक, विद्यार्थी जखमी झालेत, शाळा-महाविद्यालय बंद आहेत, स्वतंत्र भारतात नागरिक सरकारी छावण्यांत राहतायत पण कुणाला कसालाही फरक पडत नाहीए असे आव्हाड म्हणाले.

तसेच देशाच्या पंतप्रधानांना युक्रेन-रशियाचं युद्ध मिटवण्यात स्वारस्य आहे, परंतु ते एकदाही मणिपुरात गेलेले नाहीत. देशाचे सर्वांत ढोंगी आणि असंवेदनशील पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची नोंद करावी लागेल असेही आव्हाड म्हणाले.