फडणवीसांच्या चेहऱ्यावरील सुसंस्कृतपणाचा आव आणणारा बुरखा जनतेसमोर फाडणार, राष्ट्रवादीचं थेट आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप लावला होता, मात्र तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये 1.7 कोटींचा उल्लेख आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आणि अनिल देशमुख यांना बदनाम करण्याचा कट रचला होता. या गटामध्ये समित कदम यांचा देखील सहभाग होता, असे म्हणत फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील सुसंस्कृत असल्याचा बुरखा लवकरच जनतेसमोर फाडणार असल्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेल राज्याचे प्रमुख राज राजापूरकर यांनी दिले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पक्षाची बदनामी करण्याकरिता हे कटकारस्थान रचण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी अनिल देशमुख यांच्यावर दबाव टाकून काही प्रतिज्ञा पत्रांवर सहीसाठी एका व्यक्तीकडून दबाव टाकण्यात आला होता असा गौप्यस्फोट केला. समित कदम हे प्रतिज्ञापत्र घेऊन गेले होते. यावरून स्पष्ट होते की हे कटकारस्थान फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस आणि कदम यांचे संबंध यापूर्वी अनिल देशमुख सर्वांसमोर आणले आहेत, असेही राजापूरकर म्हणाले.

मित कदम यांचे विरोधी पक्षातील अनेक नेत्यांशी संबंध होते असे सत्ताधारी भाजपच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र खरी वस्तुस्थिती अशी आहे की देवेंद्र फडणवीस आणि समित कदम यांचे घनिष्ठ संबंध आहेत. या संदर्भातील फोटो प्रसार माध्यमांसमोर राज राजापूरकर यांनी दाखवले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी गणपतीची आरती करतानाचा फोटो देखील यावेळी दाखवण्यात आला. समित कदम यांच्या पत्नी देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधत असतानाचा फोटो देखील सोशल मीडियावर आहे. यावरून स्पष्ट होते की कदम आणि फडणवीस यांचे कौटुंबिक संबंध आहेत, असेही राजापूरकर म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

अनिल देशमुख यांना कशाप्रकारे अडकवण्यात आले या संदर्भातील खुलासा जनतेच्या न्यायालयात आम्ही मांडणार आहोत. देवेंद्र फडणवीस काळया कपड्यांमध्ये कसे कटकारस्थान रचतात हे आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी जो बुरखा घालून एकनाथ शिंदे यांच्यासोबत मिळून शिवसेना फोडली तो बुरखा आता आम्हाला सापडला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील सुसंस्कृत असल्याचा जो बुरखा आहे तो लवकरच आम्ही मीडियासमोर आणणार आहोत, असे राज राजापुरकर म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)