राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा; जयंत पाटील म्हणाले, तर आठ दिवसांत राजीनामा देतो

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाची जोरदार चर्चा आहे. विधानसभेतल्या पराभवानंतर पक्ष संघटनेला अधिक वेळ देणारा अध्यक्ष असावा, अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्येकाने आपल्या वॉर्डात किती मते मिळाली याची माहिती पुढील दोन दिवसांत द्या. मी आठ दिवसांत राजीनामा देतो, असे आव्हान पक्षांतर्गत विरोधकांना दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची राज्यस्तरीय आठवा बैठक गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. यामध्ये संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली. यादरम्यान प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी पदाधिकाऱयांनी केली. कार्यकर्त्यांनी थेट शरद पवार यांच्यासमोरच आपल्या भावना व्यक्त करत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांना आणि पक्षाला वेळ देणाऱयाकडे नेतृत्व सोपविण्याची मागणी केली.

दरम्यान जयंत पाटील यांनी पक्ष चालवणं हे काही सोपं काम नाही. जोरदार भाषण करून उपयोग नसतो. डोकं शांत ठेवून सर्व कार्यकर्त्यांना एक करायचं असतं. प्रत्येकाने पुढील 2 दिवसांत आपण आपल्या वॉर्डात पक्षाला किती मते मिळवून दिली ते सांगा. त्यानंतर आठ दिवसांत राजीनामा देतो, असे उत्तर पक्षांतर्गत विरोधकांना दिले आहे.

पक्ष संघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी

यापुढे पक्ष संघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. यासाठी विद्यमान पदाधिकाऱयांनी पदत्याग करण्याबाबत स्वतःहून पुढे यावे. त्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत थोडीशी जोखीम पत्करून युवकांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.