राष्ट्रवादीने आज तिसरी उमेदवार यादी जाहीर केली. त्यात 9 जणांचा समावेश आहे. परळीत अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने मराठा कार्ड वापरले आहे. मुंडे यांच्याविरोधात राजेसाहेब देशमुख यांना रिंगणात उतरवले आहे, तर नवाब मलिक यांच्या कन्येविरुद्ध अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या तिसऱया यादीची घोषणा केली. पहिल्या यादीत 45 तर दुसऱया यादीमध्ये 22 उमेदवारांचा समावेश होता. आता तिसऱया यादीतून 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
परळी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीने मराठा कार्ड वापरले आहे. तिथे राजेसाहेब देशमुख हा मराठा उमेदवार दिला आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाडय़ातील बीड मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे यांना मराठा मतांचा मोठा फटका बसला होता. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार तिथे निवडून आला होता. त्यामुळे परळीत मराठा उमेदवार दिल्याने धनंजय मुंडे यांचे गणित बिघडू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
असे आहेत उमेदवार
कारंजा ज्ञायक पटणी
हिंगणघाट अतुल वांदिले
हिंगणा रमेश बंग
अणुशक्ती नगर फहाद अहमद
चिंचवड राहुल कलाटे
भोसरी अजित गव्हाणे
माजलगाव मोहन जगताप
परळी राजेसाहेब देशमुख
मोहोळ सिद्धी रमेश कदम
-आतापर्यंत राष्ट्रवादीने 76 उमेदवारांची घोषणा केली असून त्यात 11 महिलांना संधी देण्यात आली आहे.