जनतेने जागा दाखवली म्हणून आता त्यांना बहीण-भाऊ आठवले, शरद पवार यांचा खोके सरकारवर जोरदार हल्ला

निवडणुकीत जनतेने जागा दाखवली म्हणून सरकारला आता बहीण-भाऊ आठवले आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारला सुनावले. राज्यात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याची संधी अजित पवार यांना मिळाली. मात्र त्यावेळी त्यांना बहीण, भाऊ दिसले नाहीत. यावेळी दिसले हे चांगलेच आहे. हा सगळा चमत्कार लोकसभेच्या मतांचा आहे. मतदारांनी मते व्यवस्थित दिली की बहीण, भाऊ अशी सर्वांची आठवण येते, असा मिश्कील चिमटाही शरद पवार यांनी काढला.

पुणे श्रमिक पत्रकार संघातील रत्नमोहन स्टुडिओचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित वार्तालाप कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी राज्याची आर्थिक स्थिती, मराठा-ओबीसीच्या मुद्यावरून छगन भुजबळ यांनी घेतलेली भेट, जनतेला भुलवण्यासाठी सरकार जाहीर करत असलेल्या योजना, बारामतीमधील निवडणुक आदी मुद्यांवर भाष्य केले.

अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली होती. राज्यात जातीय तणाव निर्माण झाला असून तो दूर करण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यायला हवा, अशी विनंती आपण या भेटीत केल्याची माहिती भुजबळ यांनी दिली होती. मात्र या भेटीपूर्वी भुजबळ यांनी बारामतीमधील सभेत बोलताना शरद पवारांवर टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरक्षण प्रश्नावर बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते बैठकीला येणार होते, पण बारामतीमधून एका नेत्याचा पह्न गेला आणि त्यांनी बैठकीला दांडी मारली, असे भुजबळ म्हणाले होते.

भुजबळ यांच्या भेटीसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भुजबळांना उद्देशून शरद पवार म्हणाले की, हल्ली त्यांची दोन-चार भाषणं छान झाली.भुजबळ आले होते. ते एक तास थांबले. भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणाले. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. महाराष्ट्र शांत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले असा मिश्कील टोला शरद पवार यांनी लगावला. सरकार तुमचे, अधिकार तुम्हाला, विरोधी पक्षाच्या लोकांना बाजूला ठेवून निर्णय घेतले आणि आता शांतता प्रस्थापित करायला शरद पवारांची गरज असल्याचे म्हणता, मार्गदर्शन करा म्हणून मला सांगता, अशा शब्दांत त्यांनी भुजबळांना फटकारले.

राज्यामध्ये जातीय वाद वाढायला सरकारमधील मंत्र्यांची वक्तव्ये कारणीभूत आहेत, असा थेट आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला. राज्यकर्त्यांनी वाद मिटवण्याची भूमिका घ्यायला हवी होती, मात्र ती किती घेतली हे माहीत नाही. आम्हा लोकांना बाजूला ठेवून निर्णय घेतले आणि आता शांतता प्रस्थापित करायला शरद पवारांची गरज असल्याचे सांगतात, असे ते म्हणाले. राज्यात तिसर्या आघाडीचा प्रयत्न होईल अशी शक्यता फेटाळतानाच, लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न आम्ही केला, परंतु तो यशस्वी झाला नाही, असेही पवार म्हणाले.

राज्यातील प्रशासनाचा दर्जा घसरतो आहे. सरकार आणि प्रशासनामध्ये जो सुसंवाद होऊन निर्णय घ्यावे लागतात. परंतु सध्या मी म्हणेल तसा निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. सध्याच्या सरकारमध्ये डायलॉग नाही तर डायरेक्शन दिसतात, असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला.

लोकसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे फटका बसल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, ‘विवेक’ आणि ‘ऑर्गनायझर’मधून ज्या बातम्या आल्या आणि ज्याअर्थी ते असं म्हणतात ते बघता ज्या विचाराचे घटक सरकारमध्ये आहेत ते सध्या अस्वस्थ आहेत असे वाटते.

राज्य 11 व्या क्रमांकावर गेले हे चिंताजनक

महाराष्ट्रावर 6 लाख 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. नियोजन विभागाने घोषित केलेल्या यादीत महाराष्ट्र 11 व्या क्रमांकावर आहे, हे चिंता करण्यासारखे आहे, असे पवार म्हणाले.

अरे, ती बारामती आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये विकासकामे केली असे सांगितले जाते. तरीही सुनेत्रा पवार यांचा लोकसभेला पराभव कसा झाला या थेट प्रश्नावर मार्मिक टिप्पणी करताना शरद पवार म्हणाले, अरे, ती बारामती आहे. मतदारसंघातील लोकांशी तुमचा संवाद कसा आहे? त्यावर बर्याच गोष्टी ठरतात. बारामतीत मला पुणी भेटायला आले तर मला त्यांच्या वडिलांचे नाव विचारावे लागते. तेव्हा कळते हा पुणाच्या घरातला आहे. दोन पिढीतील हा संवाद कायम ठेवला तर लोक कधीही नेत्याला विसरत नाहीत. त्यामुळे बारामतीत पुणी काहीही म्हटले तरी मला खात्री होती की, सुप्रिया सुळे यांनाच अधिक मतदान होईल. घरातलाच विरोधी उमेदवार असतानाही सुप्रिया सुळे यांना 48 हजारांचे लीड दिले. त्याचे कारण माझा दोन पिढयातील संवाद कारणीभूत आहे, असे शरद पवार म्हणाले.

महाविकास आघाडी म्हणून आम्ही उत्तम सरकार चालवून दाखवू

राज्यातील राजकीय स्थिती आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात विचारले असता शरद पवार म्हणाले, राज्यातील लोकांना बदल हवा हे स्पष्टपणे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला लोकांनी पाठिंबा दिला. आमच्यात पुठलेही मतभेद नाहीत. पाच वर्षे महाविकास आघाडी उत्तमपणे सरकार चालून दाखवील. मला स्वतःला इच्छा नाही. मी खूप बघितले, असेही त्यांनी सांगितले.

अजित पवार राष्ट्रवादीतून वेगळे झाले असले तरी ते पुटुंबाचा भाग आहेत. ते कधीही येऊ शकतात. पुटुंब कधी वेगळे होत नाही. घरात सर्वांना जागा असते, पण त्यांना पक्षात पुन्हा यायचे असेल तर मला आधी पक्षाला विचारावे लागेल. कारण फुटीनंतर मजबूतपणे पाठीशी राहिले, ज्यांनी संघर्षाचा काळ अनुभवला त्यांचे म्हणणे काय आहे? याला जास्त महत्त्व आहे. ही जरतरची गोष्ट आहे.

…म्हणून आम्ही सर्वपक्षीय बैठकीला गेलो नाही

मनोज जरांगे-पाटील आणि मुख्यमंत्री यांचा संयुक्त कार्यक्रम झाला म्हणजे त्यांच्यात संवाद होता. दुसरीकडे एका गृहस्थाने ओबीसी आरक्षणासाठी उपोषण केले, तेव्हाही सरकारचे त्यांच्याशी बोलणे झाले. जरांगे-पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात काय बोलणे झाले? मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना काय कमिटमेंट दिली? हे जनतेपुढे आलेले नाही. याबद्दलचे वास्तव पुढे येत नाही तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही म्हणून आम्ही बैठकीला गेलो नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

राज ठाकरे जागे झाले की बोलतात!

राज ठाकरे यांनी आषाढी एकादशीसाठी केलेल्या एक्स पोस्टवरून पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, राज ठाकरे बोलतात त्याचं एक वैशिष्टय़ आहे. 8-10 दिवसांनी, दोन महिन्यांनी कधी ते जागे झाले की बोलतात. ज्या विषयाची वाचकांकडून दखल घेतली जाईल, उद्याच्या पेपरमध्ये ज्याची बातमी होईल, त्याच विषयावर ते बोलतात, असा टोला शरद पवारांनी हाणला.

उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेत गैर नाही

शेकापचे जयंत पाटील यांना विधान परिषदेत उमेदवारी दिली असताना शिवसेनेने उमेदवार दिला. त्यामुळे महाविकास आघाडीत नेतृत्वावरून संघर्ष आहे का, असे पत्रकारांनी विचारले असता, उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत आणि पक्ष वाढीसाठी काही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेत काही गैर नाही, असे शरद पवार यांनी नमूद केले.