लोकशाहीमध्ये मतदानाचा दिवस पवित्र, सर्वसामान्य लोकं मला विजयी करतील; रोहित पाटील यांना विश्वास

लोकशाहीमध्ये मतदानाचा दिवस हा पवित्र दिवस आहे. या पवित्र दिवशी मतदान करत लोकशाहीमध्ये आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन मी महाराष्ट्रातील आणि तासगाव-कवठेमहंकाळमधील सर्व मतदारांना करतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली आहे. नेते एकत्र झाले असले तरी सर्वसामान्य लोकं एका बाजूला आहेत आणि सर्वसामान्य लोकं मला विजयी करतील, असा ठाम विश्वास रोहित पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यात महाविकास आघाडीसाठी अत्यंत पोषक असं वातावरण आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल ताकदीचे उमेदवार होते. पक्षासाठी आणि पक्षाच्या धोरणासाठी वातावरण पोषक आहे, असे रोहित पाटील पुढे म्हणाले.

यावेळी दोन दिवसांपूर्वी संजय काका पाटलांसोबत झालेल्या वादावरही रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. दहशत नाही, कुठल्या प्रकारची गुंडगिरी नाही. गुंडगिरी मोडून काढण्याचं काम या मतदारसंघातील लोकांनी केलेलं आहे. किंबहुना लोक गुंडगिरीच्या, दडपशाहीच्या विरोधात उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेले आहेत आणि विधानसभेच्या निकालाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोक याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत, असे रोहित पाटील म्हटले.

ज्या वेळेस एखाद्या हॉटेलमध्ये यादीसह सर्व गोष्टी पकडल्या गेलेल्या आहेत त्यावेळीस कुठेतरी निवडणूक आयोग आणि पोलिसांनी कुणी कितीही मोठं असो निःपक्षपातीपणे चौकशी करावी. कारण निःपक्षपाती चौकशी केली तर सत्य समोर येतं आणि मला विश्वास आहे निवडणूक आयोग निःपक्षपाती चौकशी करेल, असे रोहित पाटील यांनी विनोद तावडे यांच्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले.